हिंगोली(जिमाका), दि. 16 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात येणाऱ्या विशेष सखोल संक्षिप्त पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमाची सर्व कामे विहित कालमर्यादेत पूर्ण करून हिंगोली जिल्ह्याचा राज्यातील अग्रक्रम कायम राखावा, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.
विशेष सखोल संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची प्रभावी आणि यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात सर्व मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी आणि अतिरिक्त सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते मार्गदर्शन करत होते.
या प्रशिक्षण कार्यक्रमास जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रगती चोंडेकर, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विकास माने, समाधान घुटुकडे, प्रतिक्षा भुते, उपजिल्हाधिकारी राजेश सरवदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी समृद्धी दिवाने, केशव गड्डापोड यांच्यासह जिल्हास्तरीय नोडल अधिकारी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले की, पूर्व विशेष सखोल संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करत हिंगोली जिल्ह्याने महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळविला आहे. याच धर्तीवर सध्याच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेची कामेही गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांचे योग्य नियोजन करावे. यासाठी स्वतंत्र वेळापत्रक तयार करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रगती चोंडेकर यांनी विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेची माहिती देताना सांगितले की, मतदार यादीची अचूकता, सुसंगतता आणि विश्वासार्हता सुनिश्चित करण्यासाठी मतदार केंद्रांचे मॅपिंग, ब्लर फोटो हटविणे आणि विविध तांत्रिक पडताळण्या करण्यात येणार आहेत. केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण व पूर्वतयारी, घरोघरी पडताळणी मोहीम, मसुदा मतदार यादी प्रसिद्धी, दावे व हरकती स्वीकारणे, नोटीस वाटप, दावे-हरकतींचा निपटारा आणि अंतिम मतदार यादी प्रसिद्धी अशी सहा टप्प्यांतील कामे पूर्ण करावी लागणार आहेत.
मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी प्रगणक (इन्युमरेशन) अर्जाचे शंभर टक्के वितरण करण्याची जबाबदारी पार पाडावी. हे वितरण पाच दिवसांत पूर्ण करून त्यानंतर त्याचे संकलन, नागरिकांना मार्गदर्शन आणि माहितीचे अचूक डिजिटायझेशन करून वेळेत अपलोड करणे आवश्यक आहे. तसेच अनुपस्थित, स्थलांतरित आणि मृत मतदार तसेच अर्ज सादर न करणाऱ्या मतदारांची स्वतंत्र यादी तयार करून आवश्यक कार्यवाही करावी लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उपविभागीय अधिकारी प्रतिक्षा भुते यांनी मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी आणि अतिरिक्त सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या घरोघरी पडताळणी मोहिमेची माहिती देत प्रगणक अर्ज भरण्याची प्रक्रिया आणि त्याची अंमलबजावणी याविषयी सखोल मार्गदर्शन केले.
दरम्यान, पूर्व विशेष सखोल संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवून देण्यासाठी उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल मतदार नोंदणी अधिकारी प्रतिक्षा भुते, समाधान घुटुकडे आणि विकास माने यांचा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
प्रशिक्षण कार्यक्रमात विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आवश्यक बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
******
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment