हिंगोली(जिमाका), दि. १६ : "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६" अंतर्गत राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती तसेच कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी सर्व पात्र शेतकरी लाभार्थ्यांची अॅग्रीस्टॅक (Agristack) आधार मंचावर नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
या अनुषंगाने अॅग्रीस्टॅक मंचावर नोंदणी न झालेल्या शेतकऱ्यांची तालुकानिहाय व शाखानिहाय यादी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. यादीतील शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण करण्यासाठी संबंधित शाखास्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून सर्व पात्र शेतकऱ्यांनी या शिबिरांमध्ये सहभागी होऊन नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
अॅग्रीस्टॅक मंचावर नोंदणी नसल्यास संबंधित शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नसून त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधितांची राहील, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
अॅग्रीस्टॅक नोंदणीसाठी जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध शाखांमध्ये दि. १७ व १८ जून २०२६ रोजी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
वसमत तालुक्यातील आरळ, वसमत, चोंडी आंबा, गिरगाव, कुरुंदा व पूर्णा एसएसके शाखांमध्ये, कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा, कळमनुरी, पोतरा व वारंगा फाटा शाखांमध्ये, सेनगाव तालुक्यातील आजेगाव, गोरेगाव, केंन्द्रा बुद्रुक, पानकनेरगाव, साखरा व सेनगाव शाखांमध्ये, हिंगोली तालुक्यातील हिंगोली, खानापूर चित्ता, फाळेगाव, नरसी सिरसम बु. शाखांमध्ये तसेच औंढा नागनाथ तालुक्यातील औंढा नागनाथ, जवळा बाजार, लाख, शिरड शहापूर व येहळेगाव सोळंके शाखांमध्ये ही शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.
जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांनी या विशेष शिबिरांचा लाभ घेऊन अॅग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व जिल्हा उपनिबंधक श्रीमती सुरेखा फुफाटे यांनी केले आहे.
********
No comments:
Post a Comment