27 June, 2026

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना २०२६ : बळीराजाला आर्थिक दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय


महाराष्ट्राच्या अर्थसंकल्प २०२६ मध्ये राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना" जाहीर केली. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज माफ करण्यात येणार असून, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील पात्र शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर योजनेचा लाभ होणार असून, यासाठी सुमारे ३६,५८५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

*योजनेची पार्श्वभूमी*

गेल्या काही वर्षांत दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट, नैसर्गिक आपत्ती, उत्पादन खर्चात वाढ आणि बाजारभावातील चढ-उतार यामुळे राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने ही कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या नावाने ही योजना सुरू करण्यात आली आहे.
योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये
१) दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी
पात्र शेतकऱ्यांच्या दोन लाख रुपयांपर्यंतच्या थकीत पीककर्जाची माफी करण्यात येणार आहे. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेले अल्पमुदतीचे पीककर्ज या योजनेसाठी ग्राह्य धरले जाणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
२) नियमित कर्जफेड करणाऱ्यांसाठी प्रोत्साहन
ज्या शेतकऱ्यांनी वेळेवर कर्जफेड केली आहे, अशा नियमित कर्जदारांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही न्याय मिळणार आहे.
३) एकरकमी परतफेड योजना
ज्या शेतकऱ्यांनी मूळ कर्जाची काही रक्कम भरली आहे, त्यांना उर्वरित रक्कम माफ करण्यासाठी एकरकमी परतफेड योजनेचाही लाभ देण्यात येणार आहे.

*पात्रता निकष*
योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे. त्याने राष्ट्रीयीकृत, जिल्हा मध्यवर्ती सहकारी किंवा इतर पात्र बँकांकडून घेतलेले अल्पमुदतीचे पीककर्ज असावे. त्याचे दि.३० सप्टेंबर २०२५ पर्यंत कर्ज थकीत असावे. शासनाने निश्चित केलेल्या इतर अटी व निकषांची पूर्तता करणे आवश्यक राहील.

*अँग्रीस्टॅक नोंदणीचे महत्त्व*

राज्य शासनाने कर्जमाफी प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी अँग्रीस्टॅक नोंदणीला विशेष महत्त्व दिले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी अँग्रीस्टॅक नोंदणी करून घ्यावी, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांची माहिती डिजिटल पद्धतीने उपलब्ध होऊन लाभाचे वितरण सुलभ होणार आहे.
आवश्यक कागदपत्रे
कर्जमाफीसाठी आधार कार्ड, शेतक-यांचा सातबारा उतारा, बँक पासबुक, कर्ज खात्याची माहिती, अँग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक, मोबाईल क्रमांक
इतर आवश्यक कागदपत्रांची आवश्यकता लागू शकते.

*योजनेचा अपेक्षित परिणाम*

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेमुळे शेतकऱ्यांचा आर्थिक ताण कमी होऊन त्यांना नव्याने शेतीसाठी कर्ज उपलब्ध होण्यास मदत होईल. कर्जमुक्त झाल्यानंतर शेतकरी अधिक आत्मविश्वासाने शेती व्यवसाय करू शकतील. तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

"पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६" ही राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारी महत्त्वपूर्ण योजना ठरत आहे. दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी, नियमित कर्जफेड करणाऱ्यांसाठी प्रोत्साहनपर अनुदान आणि एकरकमी परतफेड योजना या माध्यमातून लाखो शेतकरी कर्जमुक्त होऊन नव्या उमेदीने शेती करू शकतील, अशी अपेक्षा आहे. मात्र, शेतक-यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने निश्चित केलेल्या सर्व अटी व प्रक्रियांची पूर्तता करणे आवश्यक आहे.

शब्दांकन : 
जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली

******

No comments: