14 June, 2026

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचा विकासकामांचा आढावा दौरा

 


कामांना गती, गुणवत्ता आणि पारदर्शकतेवर भर; अपूर्ण कामे लवकर पूर्ण करण्याच्या सूचना







हिंगोली (जिमाका), दि. 14 : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी कळमनुरी तालुक्यातील उमरदरावाडी, येडशी, तोंडापूर, भुशी व उमरदरी या गावांना भेट देऊन विविध शासकीय योजनांअंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांचा सखोल आढावा घेतला.


 विकासकामे अधिक प्रभावी, गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी त्यांनी संबंधित विभागांना आवश्यक मार्गदर्शन व सूचना दिल्या.

उमरदरावाडी येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या तलावाच्या कामाची पाहणी करताना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी कामाच्या प्रगतीची माहिती घेतली. कामे निर्धारित वेळेत पूर्ण होऊन त्याचा लाभ नागरिकांना मिळावा, यासाठी जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नियोजनबद्ध पद्धतीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

त्यानंतर त्यांनी जल जीवन मिशन अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या पाणीपुरवठा योजनेची पाहणी करून कामाच्या गुणवत्तेला प्राधान्य देण्याचे निर्देश दिले. ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी १४ वा व १५ वा वित्त आयोग निधीतून राबविण्यात आलेल्या विविध विकासकामांचीही पाहणी करण्यात आली. सार्वजनिक निधीचा पारदर्शक व परिणामकारक वापर होऊन नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी संबंधित विभागांनी नियमित देखरेख ठेवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.

पाहणी दौऱ्यादरम्यान येडशी, तोंडापूर व भुशी येथील पारझर तलाव तसेच जलसंधारण विभागामार्फत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. तसेच ॲग्री स्टॉक प्रकल्पाच्या कामकाजाची माहिती घेऊन आवश्यक त्या सूचना करण्यात आल्या. उमरदरी येथील तलावाच्या कामाचीही पाहणी करून विकासकामे अधिक परिणामकारक करण्यासाठी तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले.

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या या दौऱ्यामुळे विविध विकासकामांच्या प्रगतीला चालना मिळणार असून कामांमध्ये गुणवत्ता, पारदर्शकता आणि गती सुनिश्चित करण्यास मदत होणार आहे. यावेळी संबंधित विभागांचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*****

No comments: