* 'पी.एम. किसान उत्सव दिवस' निमित्त राज्यातील ९०.८५ लाख शेतकरी कुटुंबांना लाभ
हिंगोली, दि.१६ (जिमाका) : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत एप्रिल २०२६ ते जुलै २०२६ या कालावधीसाठीचा २३ वा हप्ता शनिवार, (दि.२०) रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर येथून वितरित करण्यात येणार आहे. या निमित्ताने केंद्र शासनाने दि. २० जून हा दिवस देशभर ‘पी.एम. किसान उत्सव दिवस’ म्हणून साजरा करण्याचे निश्चित केले आहे.
केंद्र शासनाने शेतकऱ्यांना निश्चित आर्थिक आधार उपलब्ध करून देण्यासाठी फेब्रुवारी २०१९ पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना वर्षाकाठी तीन समान हप्त्यांमध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये, असे एकूण सहा हजार रुपये थेट आधार-संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येतात.
राज्यातील पात्र शेतकरी कुटुंबांना यापूर्वी २२ हप्त्यांद्वारे सुमारे ४१ हजार ८३ कोटी रुपयांचा लाभ वितरित करण्यात आला आहे. यंदाच्या २३ व्या हप्त्याअंतर्गत भूमी अभिलेख नोंदणी अद्ययावत करणे, बँक खाते आधारशी संलग्न करणे आणि ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेल्या राज्यातील सुमारे ९०.८५ लाख शेतकरी कुटुंबांना अंदाजे १,८१७ कोटी रुपयांचा लाभ थेट हस्तांतरणाद्वारे मिळणार आहे.
पी.एम. किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांकडे फार्मर आयडी असणे आवश्यक करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विज्ञान केंद्रे, जिल्हा व तालुका कृषी कार्यालये, ग्रामपंचायती, कृषी उत्पन्न बाजार समित्या, संशोधन केंद्रे, शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी उत्पादक संघटना तसेच प्राथमिक कृषी पतसंस्था येथे विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. नागरी सुविधा केंद्रांवरूनही या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे.
कृषी, महसूल व वन तसेच ग्रामविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभर हा उत्सव साजरा करण्यात येणार असून, केंद्र शासनाच्या https://pmindiawebcast.nic.in या संकेतस्थळावरून कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
*******
No comments:
Post a Comment