• ‘अमृत मानसमित्र समुपदेशक प्रशिक्षण कार्यक्रम’साठी अर्ज सुरू
हिंगोली (जिमाका), दि. 10 : विद्यार्थ्यांमध्ये वाढत असलेला शैक्षणिक ताण, भावनिक समस्या, डिजिटल व्यसन, करिअरविषयक संभ्रम तसेच मानसिक आरोग्याशी संबंधित विविध आव्हानांचा विचार करून महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) मार्फत ‘अमृत मानसमित्र समुपदेशक प्रशिक्षण कार्यक्रम’ राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था, पुणे ही तांत्रिक भागीदार म्हणून कार्यरत राहणार आहे.
मानसशास्त्र, समुपदेशन आणि सामाजिक कार्य क्षेत्रातील युवक-युवतींसाठी रोजगार, स्वयंरोजगार आणि व्यावसायिक विकासाच्या दृष्टीने ही महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध झाली आहे. कार्यक्रमांतर्गत शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्य, भावनिक स्वास्थ्य आणि जीवनकौशल्य विकासासाठी प्रशिक्षित समुपदेशक तयार करण्यात येणार आहेत.
प्रशिक्षणामध्ये विद्यार्थी समुपदेशनाची मूलतत्त्वे, बाल व किशोर मानसिक आरोग्य, संवाद कौशल्ये, तणाव व्यवस्थापन, जीवनकौशल्य शिक्षण, आत्महत्या प्रतिबंध, सायबर सुरक्षा, पालक-शिक्षक समन्वय, मानसिक आरोग्य जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन तसेच शाळा आधारित समुपदेशन व रेफरल प्रणाली यांसारख्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे.
प्रशिक्षणाचे स्वरूप हायब्रीड (ऑफलाइन व ऑनलाइन) असून त्यामध्ये 15 दिवसांचे प्रत्यक्ष वर्ग प्रशिक्षण, एक महिन्याची निरीक्षणाधारित क्षेत्रीय नियुक्ती तसेच सहा महिन्यांचे मार्गदर्शन, पर्यवेक्षण व तज्ज्ञ सत्रांचा समावेश असेल. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना ‘अमृत मानसमित्र समुपदेशक’ हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर शाळा व महाविद्यालयीन समुपदेशक, मानसमित्र समुपदेशक, जीवनकौशल्य प्रशिक्षक, मानसिक आरोग्य जनजागृती प्रशिक्षक, विद्यार्थी कल्याण अधिकारी तसेच स्वयंरोजगाराच्या माध्यमातून समुपदेशन सेवा देण्याच्या विविध संधी उपलब्ध होऊ शकतात.
पात्रता : एम.ए./एम.एस्सी. मानसशास्त्र, एम.ए./एम.एस्सी. समुपदेशन मानसशास्त्र किंवा मास्टर ऑफ सोशल वर्क (एमएसडब्ल्यू) पदवीधारक तसेच अमृतच्या लक्षित गटातील पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. डोमिसाईल, उत्पन्नाचा दाखला व जात प्रमाणपत्र यांसारखी आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे.
सहा महिन्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमातील 15 दिवसांचे ऑफलाइन प्रशिक्षण महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था, पुणे येथे होणार असून या कालावधीतील निवास व भोजनाची व्यवस्था उमेदवारांनी स्वतः करावयाची आहे. अमृतच्या लक्षित गटातील पात्र उमेदवारांना प्रशिक्षणाचा शैक्षणिक खर्च संस्थेमार्फत वहन करण्यात येणार असल्याने हे प्रशिक्षण विनामूल्य उपलब्ध होणार आहे.
अर्ज प्रक्रिया : इच्छुक उमेदवारांनी अमृतच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करावेत. पहिल्या बॅचसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया दि. 15 जून ते 22 जून 2026 या कालावधीत सुरू राहणार आहे. पात्र उमेदवारांना ई-मेल अथवा संदेशाद्वारे कळविण्यात येईल. ‘प्रथम येईल त्यास प्राधान्य’ या तत्त्वावर प्रवेश दिला जाणार आहे.
अधिक माहितीसाठी श्रीकांत धोतरे (मो. 7391065471), जिल्हा व्यवस्थापक (अमृत), हिंगोली यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
*******

No comments:
Post a Comment