02 June, 2026

हिवताप प्रतिरोध महिना अंतर्गत ‘एक दिवस-एक कार्यक्रम’ उपक्रमाचे आयोजन

 



हिंगोली (जिमाका), दि. २ : राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात जून २०२६ हा हिवताप प्रतिरोध महिना म्हणून विविध जनजागृतीपर उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली हिवताप (मलेरिया) तसेच डेंग्यू, चिकुनगुनिया, जपानी मेंदूज्वर (जे.ई.), चंडीपुरा, हत्तीरोग आदी किटकजन्य आजारांविषयी जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘एक दिवस-एक कार्यक्रम’ या संकल्पनेवर आधारित विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


पावसाळ्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, नागरिकांचा सहभाग वाढावा आणि डासोत्पत्ती रोखण्यासाठी जनतेमध्ये जनजागृती व्हावी, हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. गावपातळीवर हिवतापाची लक्षणे, वेळेवर उपचार, प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच स्वच्छतेचे महत्त्व याबाबत विविध माध्यमांतून माहिती पोहोचविण्यात येणार आहे.


या मोहिमेअंतर्गत पत्रकार परिषद, खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांच्या सभा, जलद तापरुग्ण सर्वेक्षण, हस्तपत्रिका वाटप, क्षमता बळकटीकरणासाठी कार्यशाळा, कंटेनर सर्वेक्षण, ग्राम आरोग्य, पोषण व स्वच्छता समितीच्या बैठका, स्वच्छता मोहिमा, दिंडी, डासोत्पत्तीच्या ठिकाणी गप्पी मासे सोडण्याचा विशेष कार्यक्रम, बचत गटांच्या सभा, शिक्षकांसाठी जनजागृती कार्यक्रम तसेच विविध स्तरांवरील अधिकाऱ्यांमार्फत फवारणी कार्यक्रमांचे पर्यवेक्षण आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यासोबतच नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस ‘कोरडा दिवस’ पाळून घरातील व परिसरातील पाणी साचणारी भांडी, टाक्या, कुलर, टायर आदी स्वच्छ ठेवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.


हिंगोली जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था, आरोग्य अधिकारी व कर्मचारी, आशा स्वयंसेविका, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, स्थानिक प्रतिष्ठित नागरिक तसेच ग्रामस्थांनी लोकसहभागातून हा हिवताप प्रतिरोध महिना यशस्वी करावा, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गजानन चव्हाण यांनी केले आहे. नागरिकांनी किटकजन्य आजारांपासून संरक्षणासाठी स्वच्छता राखून प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही त्यांनी म्हटले आहे.

********

No comments: