17 June, 2026

जिल्ह्यात 'नशामुक्त सप्ताहा'स आजपासून सुरुवात * व्यसनमुक्त समाजासाठी जनजागृती अभियान

 



हिंगोली (जिमाका), दि. 17 : भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘नशा मुक्त भारत अभियान’ अंतर्गत हिंगोली जिल्ह्यात 17 ते 26 जून या कालावधीत ‘नशा मुक्त अभियान, विकसित भारत की पहचान’ या संकल्पनेवर आधारित नशा मुक्त सप्ताहास आज प्रारंभ झाला.

समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद हिंगोली  आणि स्व. कलावतीबाई देशमुख बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, हदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, हिंगोली येथे आयोजित कार्यक्रमात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे यांच्या हस्ते सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी जिल्हा समाज कल्याण अधिकारी गीता गुठ्ठे, विशेष अधिकारी अमोल घुगे, जिल्हा सल्लागार डॉ. किरण लोंढे, मानसशास्त्रज्ञ कुलदीप केळकर व आनंद साळवे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात महामानवांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. समाज कल्याण विभागामार्फत उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी कुलदीप केळकर यांनी तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या गंभीर आरोग्यविषयक दुष्परिणामांबाबत मार्गदर्शन केले. जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्रीमती गीता गुठ्ठे यांनी युवकांनी व्यसनमुक्त जीवनशैलीचा स्वीकार करून समाजात जनजागृती करण्याचे आवाहन केले.

अध्यक्षीय समारोपात डॉ. सुधीर ठोंबरे यांनी व्यसनमुक्तीचे सामाजिक महत्त्व अधोरेखित करत व्यसनाधिनतेपासून दूर राहण्याचा संदेश दिला. तसेच उपस्थितांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुरेश पठाडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विजयानंद पकाने, माधव सोनुले, चेतन कामखेडे, चंद्रमुनी नरवाडे, राहुल कांबळे, सुनील अंभोरे, श्रीमती जयश्री शिंदे तसेच समाज कल्याण विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

हिंगोली  जिल्ह्यात नशा मुक्त सप्ताहाच्या निमित्ताने विविध जनजागृती उपक्रम, शपथविधी, मार्गदर्शन सत्रे आणि सोशल मीडियाद्वारे व्यापक प्रचार-प्रसिद्धी करण्यात येणार असल्याची माहिती समाज कल्याण विभागामार्फत देण्यात आली.

*****

No comments: