15 June, 2026

स्वाधार शिष्यवृत्ती योजनेसाठी शासकीय वसतिगृह प्रवेश अर्ज अनिवार्य

 




हिंगोली(जिमाका), दि. १५ : अनुसूचित जातीतील ५० टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त करून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती योजनेच्या लाभासाठी आता शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करणे बंधनकारक करण्यात आले आहे, अशी माहिती समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त गिता गुठ्ठे यांनी दिली आहे.


सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून स्वाधार योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी  https://hmasnew.mahait.org या संकेतस्थळावर जाऊन अर्ज नोंदवावा.


शालेय अभ्यासक्रमासाठी प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३० जून २०२६ असून, इयत्ता ११ वी, १२ वी तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १५ जुलै २०२६ निश्चित करण्यात आली आहे.


गुणवत्तेनुसार अथवा जागेअभावी एखाद्या विद्यार्थ्याला शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही, तर अशा विद्यार्थ्याला स्वाधार योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. मात्र, जे विद्यार्थी शासकीय वसतिगृहासाठी अर्जच करणार नाहीत, त्यांना वसतिगृह तसेच स्वाधार या दोन्ही योजनांचा लाभ मिळणार नसल्याचे समाज कल्याण विभागाने स्पष्ट केले आहे.


ज्या तालुक्यांमध्ये शासकीय वसतिगृहाची सुविधा उपलब्ध नाही, त्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा नियम शिथिल करण्यात आला आहे. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांनी चालू शैक्षणिक वर्षासाठी वसतिगृह प्रवेश अर्ज वेळेत सादर करावा, जेणेकरून भविष्यात स्वाधार शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यास कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, असे आवाहन सहाय्यक आयुक्त गिता गुठ्ठे यांनी केले आहे.

संबंधित मागासवर्गीय पात्र विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत ऑनलाईन अर्ज सादर करून शासनाच्या या महत्त्वपूर्ण योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागामार्फत करण्यात आले आहे.

****

No comments: