हिंगोली (जिमाका), दि. 11 : राज्यातील ऑटो-रिक्षा, मीटर्ड टॅक्सी तसेच इतर प्रवासी वाहन चालक-मालकांच्या सामाजिक व आर्थिक कल्याणासाठी स्थापन करण्यात आलेल्या धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटोरिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाच्या नावामध्ये शासनाने सुधारणा केली असून, शुद्धीपत्रकान्वये सदर मंडळाचे नाव आता धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळ असे करण्यात आले आहे.
तसेच मंडळाच्या नियमावलीतही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला असून, सभासदत्वासाठीच्या पात्रतेमध्ये सुधारणा करून सर्व प्रकारची प्रवासी वाहने चालविणारे बॅजधारक अनुज्ञप्तीधारक (लायसन्सधारक) चालक मंडळाचे सदस्य होण्यासाठी पात्र ठरणार आहेत. या निर्णयामुळे राज्यातील अधिकाधिक प्रवासी वाहन चालकांना मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजना व सुविधांचा लाभ घेता येणार आहे.
मंडळामार्फत सदस्यांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्यात येत असून त्यामध्ये जीवनविमा व अपंगत्व विमा योजना, आरोग्यविषयक लाभ, कर्तव्यावर असताना दुखापत झाल्यास 50 हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य, पाल्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना, कामगार कौशल्य वृद्धी योजना, राज्य शासन निर्देशित इतर कल्याणकारी योजना, 65 वर्षांवरील ऑटो-रिक्षा व टॅक्सी परवानाधारकांसाठी निवृत्ती सन्मान योजनेअंतर्गत सानुग्रह अनुदान, नवीन वाहन व गृह खरेदीसाठी घेतलेल्या कर्जावरील व्याजाची अंशतः प्रतिपूर्ती तसेच राज्यस्तरीय मंडळाने वेळोवेळी मान्यता दिलेल्या इतर योजनांचा समावेश आहे.
मंडळाचे सदस्यत्व घेतल्यानंतर पात्र बॅजधारक प्रवासी वाहन चालकांना वरील सर्व योजनांचा लाभ मिळू शकतो. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व प्रवासी वाहने चालविणारे अनुज्ञप्तीधारक चालकांनी मंडळाचे सदस्यत्व घेण्याचे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशिष पाराशर यांनी केले आहे.
सदस्यत्व नोंदणीसाठी चालकांनी https://ananddighekalyankarimandal.org या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत परिवहन विभागाशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
*******
No comments:
Post a Comment