30 June, 2026

जुलै महिन्यात लोकसहभागातून डास नियंत्रित करा -जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गजानन चव्हाण

 

हिंगोली (जिमाका), दि. ३० : राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हिंगोली जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही जुलै २०२६ हा ‘डेंगी प्रतिरोध महिना’ म्हणून विविध जनजागृती उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. डेंगी आजाराबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करून प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये लोकसहभाग वाढविण्याच्या उद्देशाने जिल्हाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा  हिवताप अधिकारी डॉ. गजानन चव्हाण यांनी दिली.

डेंगीची लक्षणे, उपचार, प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करण्याबाबतची माहिती गावपातळीपर्यंत विविध माध्यमांतून पोहोचविण्यात येणार आहे. डासांची उत्पत्ती रोखणे आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे.

डेंगी प्रतिरोध महिन्यानिमित्त पत्रकार परिषद, खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांची बैठक, पंचायत राज सदस्यांच्या सभा, जलद ताप रुग्ण सर्वेक्षण, जनजागृती रॅली, ग्रामसभा, बाजारपेठांमध्ये माहिती प्रदर्शन, हस्तपत्रिका वितरण, आशा कार्यकर्त्यांसाठी कार्यशाळा, कंटेनर सर्वेक्षण, ग्रामीण आरोग्य, पोषण व आहार समितीच्या बैठका, स्वच्छता मोहिमा, दिंडी, चित्रकला स्पर्धा, डासांच्या उत्पत्तीस्थळी गप्पी मासे सोडण्याचा विशेष उपक्रम, बचत गटांच्या सभा, शिक्षकांसाठी जनजागृती कार्यक्रम तसेच सर्व स्तरांवरील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत फवारणी कार्यक्रमाचे पर्यवेक्षण आणि 'एक दिवस कोरडा दिवस' पाळण्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

हिंगोली जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांतील अधिकारी व कर्मचारी, आशा कार्यकर्त्या, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, स्थानिक प्रतिष्ठित नागरिक तसेच ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घेऊन गावपातळीवर डेंगी प्रतिरोध महिना प्रभावीपणे राबवावा, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गजानन चव्हाण यांनी केले आहे.

********

No comments: