* १४ जणांकडून २७०० रुपयांचा दंड वसूल
हिंगोली(जिमाका), दि. १६ : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील शासकीय कार्यालये तंबाखूमुक्त करण्यासाठी आरोग्य विभागाच्या जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षामार्फत विशेष दंडात्मक कारवाई मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत आज मंगळवारी (दि. १६ जून) जिल्हा कचेरी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात करण्यात आलेल्या तपासणीत तंबाखूयुक्त पदार्थांचे सेवन करणाऱ्या तसेच तंबाखूयुक्त पदार्थ जवळ बाळगणाऱ्या १४ जणांवर कारवाई करण्यात आली.
अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेत कोटपा-२००३ (COTPA) कायद्याच्या कलम ४ चे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. कारवाईदरम्यान १४ व्यक्तींकडून एकूण २ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्यामध्ये जिल्हा कचेरीतील १२ तर सार्वजनिक बांधकाम विभागातील २ कर्मचारी व इतर व्यक्तींचा समावेश आहे.
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी शासकीय कार्यालयांमध्ये तंबाखू-गुटखा सेवन करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिल्यानंतर ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हाभरातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये अचानक भेटी देऊन तपासणी करण्यात येत असून ही मोहीम पुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाने सर्व शासकीय कर्मचारी तसेच विविध कामांसाठी शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना कर्तव्यावर असताना अथवा कार्यालयीन परिसरात तंबाखू, गुटखा किंवा अन्य तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करू नये तसेच असे पदार्थ सोबत बाळगू नयेत, असे आवाहन केले आहे.
ही कारवाई जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाचे जिल्हा सल्लागार डॉ. किरण राजाभाऊ लोंढे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यावेळी मानसशास्त्रज्ञ कुलदीप केळकर आणि मेडिकल सोशल वर्कर आनंद साळवे यांनीही मोहिमेत सहभाग घेतला. प्रशासनाने तंबाखूमुक्त कार्यालयीन वातावरण निर्मितीसाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
***

No comments:
Post a Comment