हिंगोली (जिमाका),
दि. 29 : शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार
हमी योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या विविध कामांचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करून त्याचा
अहवाल तात्काळ सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.
जिल्हाधिकारी
कार्यालयात आयोजित आढावा बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, उपजिल्हाधिकारी
(रोहयो) राजेश सरोदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) केशव गड्डापोड, सर्व गटविकास
अधिकारी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या बैठकीत महात्मा
गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत विहिरी, गोठे तसेच इतर विविध वैयक्तिक
व सार्वजनिक कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. सुमारे ३० टक्के पूर्ण झालेली कामे,
पंचनामे पूर्ण झालेली कामे तसेच पूर्णत्वास गेलेल्या कामांच्या सद्यस्थितीची तपासणी
करण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी
राहुल गुप्ता यांनी पूर्ण झालेल्या प्रत्येक कामाचे जिओ-टॅग केलेले छायाचित्र, स्थळपाहणी
अहवाल आणि संबंधित यंत्रणेचे प्रमाणित मूल्यांकन तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले.
प्रत्येक कामासाठी स्वतंत्र फाईल तयार करून आवश्यक कागदपत्रे अद्ययावत ठेवावीत, तसेच
पंचनामे पूर्ण झालेल्या कामांना प्रत्यक्ष भेट देऊन ती प्रत्यक्षात पूर्ण झाली आहेत
की नाही, याची खातरजमा करावी, असेही त्यांनी सांगितले.
पूर्ण झालेल्या
कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार असून, तपासणीदरम्यान कोणत्याही प्रकारची अनियमितता
आढळल्यास संबंधित अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कठोर कार्यवाही करण्यात येईल,
असा इशाराही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी दिला.
******
No comments:
Post a Comment