*
व्हॉट्सअॅप क्रमांक 8208589195 वर नोंदवा अभिप्राय
हिंगोली (जिमाका),
दि. 29 : राज्यातील एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व कायदेशीर सक्षमीकरणासाठी
राज्य शासनाकडून स्वतंत्र एकल महिला धोरण तयार करण्यात येत असून हे धोरण अधिक व्यापक,
लोकाभिमुख आणि वास्तवाधिष्ठित व्हावे, यासाठी सर्व संबंधित घटकांनी आपले अभिप्राय,
सूचना व प्रस्ताव लवकरात लवकर व्हॉट्सअॅप क्रमांक 8208589195 वर नोंदवावेत, असे आवाहन
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या
सभागृहात आज एकल महिला धोरणासाठी जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेत मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे
प्रकल्प अधिकारी नामदेव केंद्रे, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी केशव गड्डापोड,
महिला व बाल विकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय बोराटे, जिल्हा महिला व
बाल विकास अधिकारी एस. आर. दरपलवार तसेच विविध विभागांचे अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे
प्रतिनिधी आणि संबंधित घटक उपस्थित होते.
राज्यातील एकल महिलांसाठी
स्वतंत्र व परिणामकारक धोरण तयार करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती. त्यानुसार महिला व बाल विकास मंत्री व राज्यमंत्री
यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व बाल विकास आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय
मसुदा समिती गठित करण्यात आली असून, राज्यभरातून प्राप्त होणाऱ्या सूचना व अभिप्रायांच्या
आधारे अंतिम धोरण निश्चित करण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर प्रत्येक
जिल्ह्यात नागरिक, एकल महिला, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक, तज्ज्ञ
व्यक्ती आणि संबंधित विभागांकडून सूचना मागविण्यात येत आहेत. हिंगोली येथे आयोजित कार्यशाळेतही
उपस्थितांकडून विविध विषयांवर अभिप्राय नोंदवून घेण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन
करताना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले की, हिंगोली जिल्ह्यात करण्यात आलेल्या
सर्वेक्षणानुसार एकल महिलांची संख्या 31 हजार 613 इतकी आहे. या महिलांना शासनाच्या
विविध योजनांचा लाभ प्रभावीपणे मिळण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रे, कागदपत्रे आणि शासकीय
सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देणे गरजेचे आहे. तसेच त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी
कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना तसेच शासनाच्या विविध
योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल. याशिवाय, एकल महिलांसाठी
उपलब्ध असलेल्या शासनाच्या सर्व योजनांची माहिती जिल्ह्याच्या संकेतस्थळावर उपलब्ध
करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महिला आर्थिक विकास
महामंडळ, उमेद आणि महिला व बाल विकास विभाग यांच्या समन्वयातून तालुकास्तरावर कार्यशाळांचे
आयोजन करावे तसेच या उपक्रमात महिला बचत गटांचा सक्रिय सहभाग वाढवावा, अशा सूचनाही
त्यांनी दिल्या. एकल महिलांपर्यंत शासनाच्या योजना प्रभावीपणे पोहोचवून त्यांचे जीवनमान
उंचावण्यासाठी संबंधित विभागांनी अधिक प्रयत्नशील राहावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यशाळेदरम्यान
विविध स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी एकल महिलांना भेडसावणाऱ्या समस्या, अडचणी
आणि गरजा याविषयी मते मांडली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी
केवळ समस्या मांडण्यापेक्षा त्यावरील उपाययोजना, नवीन योजना आणि धोरणात्मक सूचना देखील
पाठविण्याचे आवाहन केले. नागरिकांकडून प्राप्त होणारे अभिप्राय एकल महिला धोरण अधिक
प्रभावी आणि सर्वसमावेशक बनविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
एकल महिला धोरणासाठी
नागरिकांनी आपले अभिप्राय व सूचना तात्काळवर पाठवाव्यात, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या
वतीने करण्यात आले आहे.
******

No comments:
Post a Comment