बचत गटांची ९९.८ टक्के कर्जपरतफेड; महिलांनी शाश्वत उपजीविकेसाठी उद्योजकतेकडे वळावे – मान्यवरांचे आवाहन
हिंगोली(जिमाका), दि. १६ : महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) जिल्हा कार्यालय, हिंगोली यांच्या वतीने जिल्हास्तरीय वार्षिक क्रेडिट प्लॅन (२०२६-२७) कार्यशाळा हॉटेल शिवलीला पॅलेस येथे उत्साहात पार पडली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यशाळेत नवतेजस्विनी व अल्पसंख्याक प्रकल्पांतर्गत स्थापन झालेल्या स्वयं सहायता महिला बचत गटांसाठी तसेच वैयक्तिक कर्ज योजनांसंदर्भातील क्रेडिट प्लॅनचे सादरीकरण करण्यात आले. मागील वर्षातील योजना व बँकनिहाय प्रगतीचा आढावा घेऊन चालू आर्थिक वर्षासाठीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले.
माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी बाळासाहेब झिंजाडे यांनी जिल्ह्यातील ५२० स्वयं सहायता महिला बचत गटांना २५ कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती दिली. तसेच १२५ महिलांना ६५ लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज देण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील बचत गटांचा कर्जपरतफेडीचा दर ९९.८ टक्के असल्याचेही त्यांनी सांगितले.
अमरावती विभागाचे विभागीय सल्लागार केशव पवार यांनी राज्यस्तरीय कामकाजाचा आढावा घेतला, तर विभागीय व्यवसाय विकास सल्लागार पवन देशमुख यांनी वैयक्तिक कर्ज योजनांबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक सुजीत झोडगे यांनी माविमच्या बचत गटांची कामगिरी अत्यंत उल्लेखनीय व कौतुकास्पद असल्याचे सांगितले. नाबार्डचे सहाय्यक महाप्रबंधक अविनाश लहाने यांनी महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून व्यवसाय उभारून शाश्वत उपजीविका विकसित करावी, असे आवाहन केले. आयसीआयसीआय बँकेचे प्रतिनिधी लोंढे यांनी बँकेला देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
कार्यशाळेत विविध बँका, महामंडळे आणि शासकीय विभागांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. कृती संगम उपक्रमाच्या माध्यमातून बचत गटातील महिलांना वैयक्तिक लाभ मिळवून देण्यासाठी समन्वय वाढविण्याबाबत चर्चा करण्यात आली. बँकांनी अधिकाधिक कर्ज प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करत माविमच्या महिला बचत गटांना आवश्यक ते सहकार्य करण्याची भूमिका व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब झिंजाडे यांनी केले. सूत्रसंचालन सुनील चव्हाण यांनी तर आभार प्रदर्शन मुकुंद जहागीरदार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा प्रकल्प सल्लागार गजानन खिरोडकर, एमआयएस सल्लागार गजानन इंगळे, संतोष ठाकूर तसेच विविध सीएमआरसी व्यवस्थापकांनी योगदान दिले.
मान्यवरांच्या मार्गदर्शनामुळे आणि विविध संस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यशाळा यशस्वीरीत्या संपन्न झाली.
***
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment