पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी अँग्रीस्टँक नोंदणी अनिवार्य
शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. मात्र, नैसर्गिक आपत्ती, बाजारभावातील चढ-उतार, वाढता उत्पादन खर्च आणि आर्थिक अडचणींमुळे अनेक शेतकरी कर्जबाजारी होतात. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविली आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्ज माफी योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील एकट्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 908 थकबाकीदार शेतकऱ्यांना 3 कोटी 67 लाख 77 हजार 214 रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. मात्र, या लाभासाठी अँग्रीस्टँक नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
योजनेतील पात्र लाभार्थी मोठ्या प्रमाणावर वाढणार
जिल्ह्यातील इतर राष्ट्रीयकृत बँकांमध्ये कर्जखाते असलेल्या शेतक-यांचा यामध्ये समावेश नाही. त्या बँकांमधील कर्ज खातेधारक शेतक-यांची यादी अद्ययावत करण्याचे काम सुरु असून, ते ही लवकरच पूर्ण होणार आहे. त्यामुळे राष्ट्रीयकृत, व्यापारी व खासगी बँकांकडील पात्र शेतक-यांची यादी राज्य स्तरावरून अद्ययावत होणार आहे. त्यामुळे या बँकांमधील पात्र लाभधारक शेतक-यांची संख्या मोठ्या वाढणार आहे.
अँग्रीस्टँक म्हणजे काय?
अँग्रीस्टँक ही शेतकऱ्यांची एक डिजिटल ओळख प्रणाली आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीची माहिती, पीक पद्धती, शासकीय योजनांचा लाभ आणि अन्य कृषीविषयक माहिती एका डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्याचे काम अँग्रीस्टँकच्या माध्यमातून केले जाते. यामुळे शासनाच्या विविध योजना अधिक पारदर्शक, जलद आणि अचूकपणे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होते.
कर्जमाफीसाठी अँग्रीस्टँक नोंदणी का आवश्यक?
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत पात्र शेतकऱ्यांची अचूक ओळख पटविणे, लाभाची पारदर्शक अंमलबजावणी करणे आणि भविष्यातील योजनांसाठी डिजिटल डेटाबेस तयार करणे या उद्देशाने अँग्रीस्टँक नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. त्यामुळे नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात.
हिंगोली जिल्ह्यातील स्थिती
जिल्ह्यातील पाचही तालुक्यांतील एकूण 908 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असला, तरी अद्याप अनेक शेतकऱ्यांनी अँग्रीस्टँक नोंदणी केलेली नाही. या शेतकऱ्यांनी तातडीने नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरीही आहेत.
हिंगोली जिल्ह्यातील एकट्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील ९०८ शेतकऱ्यांना ३ कोटी ६७ लक्ष रुपयांचा लाभ मिळणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत यापेक्षा जास्त शेतकरी पात्र ठरून लाभार्थी होणार आहेत. मात्र त्यासाठी शेतक-यांनी अँग्रीस्टँक नोंदणी करून घेणे अनिवार्य आहे, ही बाब शेतक-यांनी लक्षात घ्यावी.
डिजिटल शेतीकडे वाटचाल
आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात शेती व्यवस्थापनही डिजिटल होत आहे. अँग्रीस्टँक ही केवळ कर्जमाफीपुरती मर्यादित नसून भविष्यातील सर्व कृषी योजनांचा पाया ठरणार आहे. पीक विमा, अनुदान, कृषी यांत्रिकीकरण, बी-बियाणे वितरण आणि इतर अनेक योजनांचा लाभ अधिक सुलभतेने मिळविण्यासाठी अँग्रीस्टँक महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे.
जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था श्रीमती सुरेखा फुफाटे यांनीही शेतकऱ्यांनी अँग्रीस्टँक नोंदणी करून शासनाच्या विविध योजनांचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
काळाची गरज : प्रत्येक शेतकऱ्याची डिजिटल ओळख
कर्जमाफीसारख्या महत्त्वाच्या योजनेचा लाभ कोणत्याही अडथळ्याशिवाय मिळवायचा असेल, तर अँग्रीस्टँक नोंदणी करणे ही काळाची गरज बनली आहे. शासनाची मदत योग्य आणि पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी डिजिटल व्यवस्थेचा स्वीकार करणे आवश्यक आहे.
त्यामुळे, "कर्जमाफीसाठी चला, अँग्रीस्टँक नोंदणी करूया" हा संदेश प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवून, शेतकरी सक्षमीकरणाच्या या अभियानात सहभागी होणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.
प्रभाकर बारहाते
जिल्हा माहिती अधिकारी, हिंगोली
No comments:
Post a Comment