05 June, 2026

गावांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी १५ व्या वित्त आयोगाच्या निधीचा प्रभावी वापर करा - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 

* जागतिक पर्यावरण दिनानिमित्त डिग्रस कऱ्हाळे येथे वृक्षारोपण व ग्रामसभा संपन्न






हिंगोली (जिमाका), दि. 05 : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे येथे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रम तसेच ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, हिंगोलीच्या गट विकास अधिकारी माया वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर आयोजित ग्रामसभेत उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी १५ व्या वित्त आयोगामार्फत प्राप्त होणाऱ्या निधीचा योग्य व नियोजनबद्ध विनियोग करून गावांमध्ये कचरा व्यवस्थापन व पाणी व्यवस्थापनाच्या सुविधा सक्षमपणे उभारण्याचे आवाहन केले. तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सक्रिय सहभाग घेऊन गावांचा सर्वांगीण व शाश्वत विकास साधावा, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत वृक्षारोपणासह वृक्षसंवर्धनाची जबाबदारी प्रत्येक नागरिकाने स्वीकारावी, असे आवाहन केले.

या कार्यक्रमास सरपंच, ग्रामविकास अधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, अंगणवाडी सेविका तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी पर्यावरण संरक्षण, जलसंवर्धन, स्वच्छता व हरित विकास याविषयी उपयुक्त मार्गदर्शन केले. कार्यक्रमामुळे पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती होऊन ग्रामस्थांनी वृक्षारोपण व पर्यावरण संरक्षणासाठी सक्रिय सहभाग नोंदविण्याचा निर्धार व्यक्त केला.

*******

No comments: