04 June, 2026

जलयुक्त शिवार व प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेची कामे गतीने पूर्ण करा - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे निर्देश

 


 

 

हिंगोली (जिमाका), दि. 04 : जलयुक्त शिवार अभियान 2.0 व प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 2.0 अंतर्गत सुरू असलेल्या कामांना गती देऊन ती विहित कालावधीत पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जलयुक्त शिवार अभियान 2.0, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 2.0 तसेच गाळमुक्त धरण–गाळयुक्त शिवार योजना अंतर्गत आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस जिल्हा जलसंधारण अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वसमतचे उपविभागीय जलसंधारण अधिकारी, उपविभागीय जलसंपदा अधिकारी, सर्व तालुका कृषी अधिकारी, कृषी उपसंचालक तसेच जलसंधारण अधिकारी (लघु पाटबंधारे विभाग, जिल्हा परिषद) उपस्थित होते.

या बैठकीत कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 2.0 अंतर्गत ढाळीचे बांध, डीपीसीसीटी, सिमेंट नाला बांध, संयुक्त गॅबियन बंधारा, अनघड दगडी बांध आदी कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. पूर्ण, अपूर्ण व प्रगतीपथावरील कामांचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना अपूर्ण कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच सर्व प्रकल्पांची कामे आराखड्यानुसार विहित मुदतीत पूर्ण करण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले. प्रगतीपथावरील कामांचे छायाचित्रे व व्हिडिओ सादर करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या. उत्पादन पद्धतीअंतर्गत वैयक्तिक शेतकरी लाभार्थ्यांना शेती साहित्य खरेदीसाठी प्रोत्साहित करण्याबरोबरच अनुदान खर्चाच्या प्रगतीचाही आढावा यावेळी घेण्यात आला.

जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत निवड करण्यात आलेल्या गावात या अभियानात जलसंधारण विभाग, लघुसिंचन (ल.पा. जि.प.), कृषी विभाग, वन विभाग, सामाजिक वनीकरण, पूर्णा पाटबंधारे विभाग व भूजल सर्वेक्षण विभाग सहभागी आहेत. सर्व संबंधित यंत्रणांनी कामे मुदतीत पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

नदीमधील गाळ शेतकऱ्यांना शेतीमध्ये वापरण्यासाठी उपलब्ध करून द्यावा. नदीपात्रातून काढलेला गाळ पुन्हा नदीत गेल्यास संबंधित कंत्राटदारांची देयके अदा करण्यात येणार नाहीत, याची नोंद घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

पावसाच्या पाण्याची साठवणूक आणि प्रत्येक थेंबाचे संवर्धन या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व जलसाठ्यांची गणना व जिओ-टॅगिंग करण्याचे काम तातडीने सुरू करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी संबंधित विभागांना दिले.

*****

No comments: