05 June, 2026

महिला व बालकांच्या संरक्षणाबाबत जनजागृती कार्यक्रम संपन्न

 


* केसापूर येथे कायदे, बालहक्क व संरक्षण यंत्रणांविषयी नागरिकांना मार्गदर्शन




हिंगोली (जिमाका), दि. 04 : महिला व बालकांचे संरक्षण, बालहक्क, बालकांवरील अत्याचार प्रतिबंध तसेच विविध पोलिस व बाल संरक्षण कायद्यांविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने हिंगोली तालुक्यातील मौजे केसापूर येथे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हिंगोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात ग्रामस्थ, महिला, युवक व बालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.


यावेळी दामिनी पथकाच्या अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमलता जगताप यांनी महिलांच्या व बालकांच्या सुरक्षेसाठी अस्तित्वात असलेल्या विविध कायद्यांची सविस्तर माहिती दिली. महिलांवरील अत्याचार, कौटुंबिक हिंसाचार, छेडछाड, सायबर गुन्हे, मानवी तस्करी तसेच बालकांवरील लैंगिक अत्याचार यांसारख्या गंभीर विषयांवर मार्गदर्शन करत महिलांच्या संरक्षणासाठी उपलब्ध कायदेशीर तरतुदींची माहिती दिली. कोणत्याही प्रकारच्या अन्याय, अत्याचार किंवा शोषणाची घटना घडल्यास तात्काळ पोलिस प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले.


जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006, गाव बाल संरक्षण समिती, पोक्सो कायदा, बाल न्याय (काळजी व संरक्षण) अधिनियम 2015, बालकांचे हक्क, बाल संरक्षण यंत्रणा, संकटग्रस्त व गरजू बालकांसाठी उपलब्ध शासकीय सुविधा तसेच बालकल्याण समितीची भूमिका याबाबत सविस्तर माहिती दिली. जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देत बालकांवरील अत्याचार, दुर्लक्ष, शोषण अथवा बालविवाहाची माहिती मिळाल्यास ती तात्काळ संबंधित यंत्रणांना देण्याचे आवाहन त्यांनी केले.

तसेच चाईल्ड हेल्पलाईन 1098 या मोफत व 24 तास उपलब्ध असलेल्या आपत्कालीन सेवेबाबत माहिती देण्यात आली. संरक्षणाची गरज असलेल्या अथवा अडचणीत सापडलेल्या बालकांसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगून कोणतेही बालक संकटात आढळल्यास तात्काळ 1098 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.


कार्यक्रमास महिला पोलीस आरती साळवे, पोलीस अंमलदार गणेश सोनटक्के, पोलीस हवालदार हिम्मतराव सरनाईक, तथागत इंगळे (चाईल्ड हेल्पलाईन 1098), दामिनी पथकातील अधिकारी व कर्मचारी, शाळेचे मुख्याध्यापक हरिभाऊ मुटकुळे, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान उपस्थित महिला, युवक व बालकांनी विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.


या जनजागृती कार्यक्रमामुळे महिला व बालकांच्या हक्कांबाबत तसेच त्यांच्या संरक्षणासाठी उपलब्ध कायदे, सेवा व यंत्रणांबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण झाली. महिला व बालकांवरील अत्याचारमुक्त, सुरक्षित व संवेदनशील समाज निर्मितीसाठी अशा प्रकारच्या जनजागृती उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.


********

No comments: