12 June, 2026

जिल्हास्तर क्रीडा प्रतिभा विकास केंद्रासाठी क्रीडा मार्गदर्शक प्रशिक्षक उपलब्ध करून देण्याचे आवाहन

 


हिंगोली(जिमाका), दि. 12 : जिल्ह्यातील गुणवंत खेळाडूंना प्रोत्साहन देऊन त्यांचा सर्वांगीण क्रीडा विकास साधण्यासाठी जिल्हास्तर क्रीडा प्रतिभा विकास केंद्र, हिंगोली कार्यान्वित करण्यात आले आहे. या केंद्रासाठी मैदानी (अॅथलेटिक्स) क्रीडा प्रकाराकरिता बाह्य स्रोत यंत्रणेद्वारे क्रीडा मार्गदर्शक प्रशिक्षकाची नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा कार्यालयाने दिली आहे.

या पदासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता किमान मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक असून बी.पी.एड., एम.पी.एड. किंवा क्रीडा विज्ञानातील पदवीधारकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच एन.आय.एस. डिप्लोमा इन कोचिंग (अॅथलेटिक्स) किंवा समतुल्य अभ्यासक्रम पूर्ण केलेला, अथवा वर्ल्ड अॅथलेटिक्स संघटनेचा लेव्हल-1 कोर्स अथवा सहा आठवड्यांचा एन.आय.एस. प्रमाणपत्र अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

उमेदवारास किमान एक वर्षाचा राज्यस्तरीय प्रशिक्षणाचा अनुभव असावा. राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी खेळाडूंना प्रशिक्षण दिल्याचा अनुभव तसेच युवा खेळाडूंसोबत काम केलेल्या प्रशिक्षकांना प्राधान्य दिले जाईल. उमेदवाराचे वय किमान 21 वर्षे व कमाल 45 वर्षे असावे. मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य असून इंग्रजी भाषेचे ज्ञान असल्यास प्राधान्य दिले जाईल.

याशिवाय उमेदवार आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय पदकविजेता खेळाडू असावा. खेळाडूंच्या प्रगती नोंदी, अहवाल सादर करणे व डेटा व्यवस्थापनासाठी मूलभूत संगणक ज्ञान आवश्यक आहे. शासनमान्य वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्राप्त वैध वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र सादर करणेही बंधनकारक राहणार आहे.

उपरोक्त निकषांनुसार पात्र क्रीडा मार्गदर्शकाची नेमणूक करण्यास इच्छुक बाह्य यंत्रणांनी आपल्या दरपत्रकासह अर्ज जिल्हा क्रीडा कार्यालयाकडे दि. 15 जून 2026 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी डॉ. निलकंठ श्रावण (राज्य क्रीडा मार्गदर्शक) यांच्याशी संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.


*********

No comments: