25 September, 2019

महिला,तरुणांची मतदान टक्केवारी वाढवा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या स्वीप समिती बैठकीत सूचना






महिला,तरुणांची मतदान टक्केवारी वाढवा
जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या स्वीप समिती बैठकीत सूचना

       हिंगोली, दि.25 : महिला आणि तरुणांची मतदानातील टक्केवारी वाढवा, त्यासाठी प्रयत्न करा अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी रुचेश जयवंशी यांनी आज दिल्या.
          जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा आणि मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हास्तरीय स्वीप समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीची आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड, उपजिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी राजू नंदकर, जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत, स्वीप समितीच्या नोडल अधिकारी रेणुका तम्मलवार आदी उपस्थित होते.
          श्री. जयवंशी यांनी सांगितले की, मतदान प्रक्रियेत महिला आणि तरुणांचा सहभाग वाढायला हवा. त्यासाठी स्वीपचा आराखडा तयार करा. महिलांचा सहभाग वाढण्यासाठी महिला बचत गट, महिला आर्थिक विकास महामंडळाचे बचत गट, बँक सखी, कृषी सखी यांची मदत घ्या.
          जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागामार्फत विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात यावे. त्यामध्ये मतदान करण्याबाबत जनजागृती करावी. मतदारांचे प्रबोधन करावे, असेही श्री. जयवंशी यांनी सांगितले.
          बैठकीस प्रकल्प संचालक प्रविणकुमार घुले, माध्यमिक शिक्षणाधिकारी पी.बी. पावसे, प्राथमिक  शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के, प्रा. विक्रम जावळे, औंढा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निशीकांत प्रचंडराव, सेनगाव नगर पालिकेचे  मुख्याधिकारी शैलेश फडसे आदी उपस्थित होते.
घंटागाडीवरुन होणार मतदार जनजागृती
हिंगोली , कळमनुरी  नगर परिषदेच्या घंटागाडीद्वारे मतदार जनजागृती करण्याचा निर्णय  बैठकीत घेण्यात आला. हिंगोली नगर परिषदेच्या 24 आणि कळमनुरी नगर परिषदेच्या 15 घंटागाडी आहेत. या गाडीवरुन मतदार जनजागृती केली जाणार आहे. याचबरोबर शिक्षण विभागाकडून विविध स्पर्धा, योग क्‌लब , नवरात्र मंडळ येथेही मतदार जनजागृती केली जाणार आहे, असे श्रीमती रेणुका तम्मलवार यांनी सांगितले.
000000

No comments: