07 October, 2019

समन्वयाने अचूक काम करा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या नोडल अधिकाऱ्यांना सूचना









समन्वयाने अचूक काम करा
जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या नोडल अधिकाऱ्यांना सूचना

      हिंगोली, दि.7: जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघातील निवडणूक प्रक्रिया निर्भय, मुक्त आणि शांततामय वातावरणात पार पाडण्यासाठी  सर्व नोडल अधिकारी आणि पथके यांनी समन्वयाने अचूक काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रुचेश जयवंशी यांनी आज येथे दिल्या.
        जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज नोडल अधिकारी यांची आढावा बैठक झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी जयवंशी यांनी वरील सूचना दिल्या. बैठकीस निवडणूक निरीक्षक डॉ. रेणू राज, कायदा व सुव्यवस्था निरीक्षक दिपक कुमार, पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अतिरिक्त जिल्हाधिकारी जगदीश मिनीयार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी राजू नंदकर आदी उपस्थित होते.
       जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी निवडणूक  निरीक्षक डॉ. रेणू राज आणि श्री. दीपक कुमार यांना जिल्हा प्रशासनाने स्थापन केलेली विविध पथके आणि त्यांच्या कामकाजाच्या पध्दतीबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले, निवडणुकीसाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत. तीनही मतदारसंघात अधिकारी-कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.अधिकारी आणि कर्मचारी यांची प्रशिक्षण सुरु आहेत. जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत पोलीस प्रशासनाकडून खबरदारीचे उपाय घेण्यात आले आहेत.
        जिल्ह्यातील तीन मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी स्वीप अंतर्गत विविध उपक्रम राबवले जात आहेत. नवरात्र उत्सव, दसरा महोत्सव येथे मतदार जनजागृतीचे कक्ष सुरु करण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुकीत कमी मतदान झालेल्या बूथवर जाणीव जागृती केली जावी, यासाठी कला पथकांच्या माध्यमातून मतदार जागृती केली जात आहे, अशी माहिती त्यांनी बैठकीत दिली.
        निवडणूक निरीक्षक डॉ. रेणू राज यांनी ईव्हीएम मशीन, व्हीव्हीपॅट ची तयार आयोगाच्या निर्देशानुसार करावी. मतदारांना व्होटर स्लिप  वितरीत करण्यात याव्यात, अशा सूचना दिल्या.
         प्रारंभी सर्व नोडल अधिकारी यांनी निवडणूक निरीक्षकांना परिचय देऊन निवडणूक कालावधीत देण्यात आलेल्या जबाबदारीची थोडक्यात माहिती दिली. बैठकीत उपजिल्हाधिकारी गोविंद रणविरकर, जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत, स्वीपचे नोडल अधिकारी गणेश शिंदे, सहायक आयुक्त भाऊसाहेब चव्हाण, कोषागार अधिकारी पी.व्ही. पुंडगे, स्थानिक निधी लेखा परीक्षा विभागाचे सहायक संचालक महेश देशमुख, उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक एम.पी. राऊत आदी उपस्थित होते.
       



No comments: