04 February, 2026

जिल्हा वार्षिक योजना निधी मागणीचे प्रस्ताव तात्काळ सादर करावेत – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 



हिंगोली (जिमाका), दि. 04 : जिल्हा वार्षिक योजना निधी मागणीचे प्रस्ताव सर्व विभागांनी तात्काळ सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आढावा बैठकीत दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, जिल्हा नियोजन अधिकारी अनिता लव्हारे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी गं. गो. चितळे, प्रदीप नळगीरकर, समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त गीता गुठ्ठे यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत दायित्व व निधी मागणीचे परिपूर्ण प्रस्ताव तसेच जनसुविधांशी संबंधित दायित्वाचे प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. सन 2024-25 मधील दायित्वाच्या निधी मागणीचे प्रस्ताव संबंधित कामे पूर्ण झाल्याच्या अहवालासह दिनांक 15 फेब्रुवारीपर्यंत सादर करावेत. अन्यथा मार्च 2026 नंतर निधी उपलब्ध करून दिला जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.

तसेच विविध विकास योजनांअंतर्गत वितरित करण्यात आलेला निधी विहित कार्यपद्धतीनुसार तातडीने खर्च करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या.

या बैठकीत सन 2025-26 मधील नवीन कामांना प्रशासकीय मान्यता, निधी वितरण प्रक्रिया, सर्वसाधारण योजना, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना, पायाभूत सुविधा प्रकल्पांना युनिक आयडी देणे तसेच पुनर्विनियोजन प्रस्ताव यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

*****

No comments: