हिंगोली(जिमाका), दि. 03 : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत ० ते १८ वर्ष वयोगटातील संदर्भित हृदयरुग्ण विद्यार्थ्यांसाठी जिल्हा रुग्णालय, हिंगोली येथे टूडी-इको तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबीरामध्ये किम्स हॉस्पिटल, ठाणे येथील तज्ज्ञ कार्डिओलॉजिस्ट डॉ. श्रीनिवास एल., डॉ. सोनिया कारापूरकर तसेच विजय खरात व उल्हास पाटील यांनी तपासण्या केल्या.
हे शिबीर मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड हिंगोली तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस आणि अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडले.
या शिबीरास उपस्थित विशेषतज्ज्ञांचे स्वागत डॉ. दीपक मोरे (वैद्यकीय अधीक्षक), डॉ. शैलेजा कुप्पास्वामी (नियंत्रक वैद्यकीय अधिकारी – बाल स्वास्थ्य), डॉ. नितीन पुरोहित (सहाय्यक वैद्यकीय अधीक्षक), डॉ. नितीन अग्रवाल (बालरोग तज्ज्ञ), श्रीमती आशा क्षीरसागर (सहाय्यक मेट्रन) आदी मान्यवरांनी केले.
या शिबीराच्या यशस्वीतेसाठी श्रीमती शिंदे (अधिपरिचारिका), श्रीमती कदम (परिचारिका), गाभणे लक्ष्मण (जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक), ज्ञानोबा चव्हाण, राजेंद्र खंदारे , ब्रदीनाथ शेळके तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम व डीईआयसी कार्यक्रमातील वैद्यकीय अधिकारी, औषधनिर्माते, ए.एन.एम., कार्यालयीन कर्मचारी व रुग्णालयीन परिचारिकांनी परिश्रम घेतले.
हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ व सेनगाव तालुक्यातील एकूण १७० संशयित हृदयरुग्ण विद्यार्थ्यांची टूडी-इको तपासणी करण्यात आली. यापैकी ३५ विद्यार्थ्यांना हृदयशस्त्रक्रियेसाठी संदर्भित करण्यात आले असून, त्यांच्या शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजना व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत किम्स हॉस्पिटल, ठाणे येथे मोफत करण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमाअंतर्गत यापूर्वी यशस्वी शस्त्रक्रिया झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी योग्य वेळी उपचार मिळाल्याबद्दल राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. तसेच हिंगोली जिल्ह्यातील विद्यार्थी व पालकांनी दैनंदिन जीवनात हृदयविकारासंदर्भात वेळोवेळी टूडी-इको तपासणी करून वेळेत आजाराचे निदान करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी केले आहे.
***

No comments:
Post a Comment