27 February, 2026

वसतिगृह प्रवेश अर्जासाठी १० मार्चपर्यंत मुदतवाढ * विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 27 : सन 2025-26 करिता राज्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह तसेच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेंतर्गत प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांकडून मुदतवाढीची मागणी तसेच वसतिगृह प्रवेशासाठी अपेक्षित अर्ज संख्या प्राप्त न झाल्याने प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ वर्षातील (बिगर व्यावसायिक व व्यावसायिक अभ्यासक्रम) विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार अर्ज करण्याचा कालावधी दि. 10 मार्च 2026 पर्यंत वाढविण्यात आला आहे.

स्वयंम व आधार योजनांचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शपथपत्र सादर करणे बंधनकारक असून, त्यामध्ये विद्यार्थी भाड्याने राहत असल्याबाबत, स्थानिक रहिवासी नसल्याबाबत, शासकीय वसतिगृहात प्रवेश न घेतल्याबाबत, आई-वडिलांसोबत राहत नसल्याबाबत तसेच शिक्षण घेताना कोणतीही नोकरी किंवा व्यवसाय करणार नसल्याबाबतची प्रतिज्ञापत्रे सादर करावी लागतील.

शासकीय वसतिगृहासाठी पात्र असूनही गुणवत्तेनुसार किंवा क्षमतेअभावी प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी विचारात घेतले जाणार आहेत.

हिंगोली जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी शासनाने दिलेल्या मुदतीत दि. 10 मार्च 2026 या पर्यंत https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत, असे आवाहन संबंधित विभागामार्फत करण्यात आले आहे.

*******

No comments: