17 February, 2026

खारघर येथे गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमाचे आयोजन

 



* पालघर जिल्ह्यातील आश्रमशाळेत शालेय स्तरावर विविध प्रबोधनपर उपक्रम



पालघर, दि. १७ फेब्रुवारी : शीख धर्मातील नववे गुरु, ‘हिंद-दि-चादर’ म्हणून ओळखले जाणारे गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नवी मुंबईतील खारघर येथे दि. २८ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळा, टाकवहाळ येथे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, मानवता आणि धार्मिक सहिष्णुतेचे संस्कार रुजविण्यासाठी विविध शैक्षणिक व जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात शिक्षक प्रमोद देवसरकर यांनी गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या प्रेरणादायी जीवन कार्यावरील माहितीपर भाषणाने केली. काश्मिरी पंडितावरील धार्मिक अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी तत्कालीन मुघल सम्राट औरंगजेब याला दिलेले थेट आव्हान आणि धर्म स्वातंत्र्यासाठी दिलेले सर्वोच्च बलिदान याचा उल्लेख करत विद्यार्थ्यांना इतिहासातील त्या निर्णायक क्षणाची जाणीव करून दिली.

मुख्याध्यापक विशाल सोनकांबळे यांनी आपल्या भाषणात गुरुजींच्या पंजाब, बिहार, आसाम व बंगाल पर्यंतच्या व्यापक प्रवासाचा आढावा घेतला. त्यांनी लोकांमध्ये धार्मिक सहिष्णुता, बंधुता आणि नैतिक मूल्यांची ज्योत प्रज्वलित करण्यासाठी केलेल्या कार्याचे स्मरण करून विद्यार्थ्यांना त्यांच्या आदर्शांचा अंगीकार करण्याचे आवाहन केले.


*वकृत्व स्पर्धेतून इतिहासाचा जागर*

इयत्ता पाचवी ते सातवीतील विद्यार्थ्यांसाठी “गुरु तेग बहादूर साहिबजी यांचे जीवन व बलिदान” या विषयावर वकृत्व स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासपूर्ण आणि प्रभावी शैलीत वक्तृत्व सादर करत त्यांच्या जन्मस्थळ अमृतसर येथील बालपणापासून ते दिल्लीतील शहादतीपर्यंतचा प्रवास उलगडला. काही विद्यार्थ्यांनी त्यांच्या बलिदानामुळे भारतात धार्मिक स्वातंत्र्याची परंपरा कशी अबाधित राहिली, याचे सखोल विवेचन केले.


*प्रभात फेरीतून जनजागृती*

शाळा परिसरात प्रभात फेरी काढण्यात आली. “धर्मस्वातंत्र्याचे रक्षक – गुरु तेग बहादूर साहिबजी अमर राहो!”, “मानवतेसाठी दिले बलिदान – गुरु तेग बहादूर महान!” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांमध्येही इतिहासाविषयी जागर निर्माण झाला.

माहितीपटातून प्रेरणेचा साक्षात्कार

विद्यार्थ्यांना गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या जीवनावर आधारित माहितीपट दाखविण्यात आला. त्यांच्या बालपणापासून ते दिल्ली येथे दिलेल्या बलिदाना पर्यंतचा प्रवास पाहताना विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्सुकतेने सहभाग नोंदविला. धार्मिक स्वातंत्र्यासाठी केलेल्या त्यागाची गाथा विद्यार्थ्यांच्या मनावर ठसा उमटवून गेली.

गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी वर्षानिमित्त आयोजित या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाबद्दल अभिमान, राष्ट्रनिष्ठा आणि मानवतेची मूल्ये अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. खारघर येथील मुख्य समारंभाच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील हा उपक्रम सामाजिक ऐक्य आणि धार्मिक सहिष्णुतेचा प्रभावी संदेश देणारा ठरला.

******

No comments: