12 February, 2026

जिल्हा वार्षिक योजनेच्या राज्यस्तरीय बैठकीत हिंगोली जिल्ह्यासाठी 536 कोटी 88 लाख रुपयाची अतिरिक्त मागणी

 



 

हिंगोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जास्तीत जास्त वाढीव निधी देण्यात येईल

                                                                                                            - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

 

हिंगोली, (जिमाका) दि. 12 : हिंगोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच रस्ते, पूल, शिक्षण, कृषी, जलसंधारण आदी पायाभूत सुविधांसाठी जास्तीत जास्त वाढीव निधी देण्यात येणार असून, जिल्ह्यात होणाऱ्या दर्जात्मक विकासकामावर भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्यप्रणालीद्वारे राज्यस्तरीय प्रारुप आराखडा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस दूरदृश्यप्रणालीद्वारे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ, नियोजन विभागाचे प्रधान सचिव श्रीमती शैला ए. , जिल्ह्याच्या पालकसचिव श्रीमती रिचा बागला, नियोजन विभागाचे उपायुक्त विजय पवार उपस्थित होते.

 जिल्हा वार्षिक योजना 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सर्वसाधारण वार्षिक योजनेतर्गंत प्रत्यक्ष 201 कोटी 66 लाख रुपयांचा प्रारुप आराखडा तयार करण्यात आला होता. या आराखड्यास जिल्हा नियोजन समितीने मंजुरी दिली आहे. आज आयोजित राज्यस्तरीय प्रारुप आराखडा बैठकीत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी 536 कोटी 55 लाख 88 हजार रुपयांची अतिरिक्त मागणीबाबत सविस्तर सादरीकरण केले.

दूरदृश्य प्रणालीद्वारे आमदार सर्वश्री तान्हाजी मुटकुळे, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलभ रोहन, सहायक जिल्हाधिकारी योगेशकुमार मीना, जिल्हा नियोजन अधिकारी अनिता लव्हारे, सहायक नियोजन अधिकारी ग.गो.चितळे, प्रदीप नळगीरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी हिंगोली जिल्ह्यातील रस्ते, शाळा, ग्रामीण रुग्णालय, आरोग्य केंद्रे, प्रशासकीय इमारती, श्री. संत नर्सी नामदेव व औंढा नागनाथ तीर्थक्षेत्र विकास तसेच जिल्ह्याचा पायाभूत व मूलभूत विकास करण्यासाठी जास्तीत जास्त वाढीव निधी देण्याची मागणी केली.

यावेळी आमदार तानाजी मुटकुळे यांनी जिल्ह्याचे सिंचन वाढविणे, पाणंद रस्त्याची कामे तसेच निजामकालीन मोडकळीस आलेल्या शाळेचे बांधकाम आदी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता असल्याचे सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी जिल्हा नियोजन समितीमध्ये मंजूर झालेल्या जिल्हा वार्षिक योजनेच्या प्रारुप आराखड्याची सविस्तर माहिती सादर केली.

कृषी व संलग्न सेवामध्ये मत्स्य उत्पादनात वाढ, पशु विकास, स्मशान भूमी शेड बांधकाम, आठवडी बाजार विकसित करणे, भूमीगत गटार, ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम, कयाधू नदीवर अतिरिक्त सिंचन क्षेत्र निर्माण कोल्हापुरी बंधारे प्रस्तावित करणे, पाझर तलाव व सिंचन तलाव दुरुस्ती, नवीन अंगणवाडी बांधकाम व सोलार संच पुरवणे, महिला बचत गटाकरिता विक्री केंद्र उभारणे, रस्ते व पूलाचे बांधकाम, पोलीस दलाकरिता वाहने व अत्याधुनिक सामुग्री खरेदी, श्रीक्षेत्र औंढा नागनाथ देवस्थानचा विकास तसेच टुरिझम सर्कीट उभारणे तसेच संत नामदेव मंदिर व श्री नानाजी देशमुख यांच्या गावात म्युझियम उभारणे यासह जिल्ह्यातील विविध यात्रास्थळांच्या ठिकाणी भौतिक सोयीसुविधा निर्माण करणे आदी जिल्ह्यातील विविध विकास कामासाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता असल्याचे जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी यावेळी सांगितले.

यावेळी हिंगोली जिल्ह्यातील विविध विभागाच्या विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.

******* 



No comments: