12 February, 2026

महाशिवरात्री निमित्त भगरीच्या सेवनाबाबत नागरिकांनी घ्यावी काळजी – अन्न व औषध प्रशासन विभागाचे आवाहन

 

हिंगोली(जिमाका), दि. 12 : दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी महाशिवरात्री असल्यामुळे मोठ्या प्रमाणात भाविक उपवास करतात. उपवासाच्या दिवशी भगरीचे विविध पदार्थ सेवन करण्याची प्रथा आहे. तथापि, भगर खाल्ल्यामुळे अन्न विषबाधा झाल्याच्या घटना राज्यात वारंवार घडत असल्याने नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत करण्यात आले आहे.

भगर हा भरड धान्याचा एक प्रकार असून वरई, सावा, बर्टी व कोद्रा या धान्यांपासून ती तयार केली जाते. धान्याच्या प्रकारानुसार वरई भगर, सावा भगर, बर्टी भगर व कोद्रा भगर असे प्रकार पडतात. वरई भगर उच्च प्रतीची तर कोद्रा भगर तुलनेने हलक्या प्रतीची समजली जाते. भगरीत कार्बोहायड्रेट्स, डायटरी फायबर्स तसेच कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम यांसारखी खनिजे आढळतात. तिचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने मधुमेही रुग्णांसाठीही ती उपयुक्त मानली जाते.

अन्न व औषध प्रशासनाच्या अभ्यासानुसार, भगरीवर Aspergillus tamarii प्रजातीच्या बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामधून Fumigaclavin A, Cyclopiazonic Acid तसेच Aflatoxin, Ergotoxins यांसारखी मायकोटॉक्सिन्स तयार होण्याची शक्यता असते. 25 ते 32 अंश सेल्सिअस तापमान व आर्द्रता बुरशी वाढीस अनुकूल ठरते. अशा प्रकारे बाधित भगर सेवन केल्यास अन्न विषबाधा होऊ शकते.


भगर खाताना घ्यावयाची काळजी :

शक्यतो पॅकबंद व नामांकित ब्रँडची भगर खरेदी करावी. पाकीटावरील पॅकिंग दिनांक व अंतिम वापर दिनांक तपासावा. सूटी अथवा लेबल नसलेली भगर खरेदी करू नये. भगर स्वच्छ, कोरड्या व हवाबंद डब्यात साठवावी. जास्त दिवस साठवलेली भगर वापरू नये.

भगरीचे पीठ तयार स्वरूपात खरेदी करण्याऐवजी आवश्यक तेवढीच भगर दळून घ्यावी. पिठात ओलावा शोषण्याची क्षमता जास्त असल्याने बुरशी वाढण्याची शक्यता असते.

शक्यतो घरीच (मिक्सर/ग्राइंडर) दळून ताजे पीठ वापरावे. जाड कोद्रा भगर टाळावी. सलग उपवासाच्या काळात भगर व शेंगदाणे यांसारखे प्रथिनयुक्त पदार्थ मर्यादित प्रमाणात घ्यावेत, अन्यथा अॅसिडिटी, उलटी, मळमळ व पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.


विक्रेत्यांसाठी सूचना :


पॅकबंद भगरीचीच विक्री करावी व घाऊक खरेदीची पावती जतन करावी. पॅकेट/पोत्यावर उत्पादकाचा पत्ता, परवाना क्रमांक, पॅकिंग दिनांक व अंतिम वापर दिनांक नमूद असल्याची खात्री करावी. मुदतबाह्य भगर अथवा भगर पिठाची विक्री करू नये. सूटी किंवा खुले भगर व भगर पीठ विक्रीसाठी ठेवू नये. महाशिवरात्री निमित्त उपवास करताना भगरीचे सेवन सुरक्षित पद्धतीने करावे व वरील सूचना पाळून संभाव्य अन्न विषबाधा टाळावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, परभणी/हिंगोली यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

******

No comments: