* उपचारांना मिळाली नवी दिशा
* ७३ रुग्णांना ९७ लाख रुपयांची मदत
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील सय्यद युनूस हे मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दिवसेंदिवस कष्ट करत कुटुंबाची जबाबदारी पार पाडत असताना त्यांना अचानक मेंदूविकाराचा गंभीर आजार झाला आणि कुटुंबासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले होते.
घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने महागड्या उपचारांचा खर्च उचलणे कुटुंबासाठी अशक्य झाले होते. अशा कठीण प्रसंगी महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी अंतर्गत त्यांना एक लाख रुपये इतकी आर्थिक मदत मंजूर करण्यात आली. ही रक्कम थेट रुग्णालयात जमा झाल्यामुळे त्यांच्या उपचारांना तात्काळ गती मिळाली.
या मदतीमुळे सय्यद युनूस व त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला. "अचानक आलेल्या आजारामुळे आम्ही पूर्णपणे खचून गेलो होतो; मात्र शासनाच्या मदतीमुळे आम्हाला नव्याने आशा मिळाली," अशी भावना श्री. सय्यद यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली.
या सहाय्याबद्दल सय्यद युनूस सय्यद हमीद व त्यांच्या कुटुंबीयांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांचे मनःपूर्वक आभार मानले.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी ही योजना गरजू रुग्णांसाठी संजीवनी ठरत असून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मोठा आधार देत आहे. हिंगोली जिल्ह्यात मुख्यमंत्री सहायता कक्षाच्या माध्यमातून आतापर्यंत 73 रुग्णांना एकूण 56 लाख 95 हजार रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे.
गंभीर आजारांवरील उपचारांसाठी मोठा खर्च होत असल्याने अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवते. अशा परिस्थितीत या निधीतून मिळणारी मदत रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांसाठी दिलासा देणारी ठरत आहे. मुख्यमंत्री सहायता कक्ष, हिंगोली यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे गरजू रुग्णांना वेळेत आर्थिक सहाय्य उपलब्ध होत असून नागरिकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत आहे.
गरजू नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन भोसले यांनी केले आहे.
संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली
******

No comments:
Post a Comment