• 5 एप्रिलपर्यंत आवेदनपत्र सादर करण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 16 : महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून (उत्तराखंड) येथे इयत्ता 8 वी मध्ये प्रवेशासाठी पात्रता परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. ही प्रवेश परीक्षा रविवार, दिनांक 7 जून 2026 रोजी पुणे येथे होणार असून या परीक्षेसाठी मुले व मुली दोघेही पात्र आहेत.
या परीक्षेसाठी शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवार विद्यार्थी/विद्यार्थिनी दि. 01 जानेवारी 2027 रोजी कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेत इयत्ता 7 वी मध्ये शिकत असावा किंवा इयत्ता 7 वी उत्तीर्ण असावा. तसेच वयोमर्यादेनुसार उमेदवाराचे वय दि. 01 जानेवारी 2027 रोजी 11 वर्षे 6 महिन्यापेक्षा कमी व 13 वर्षांपेक्षा अधिक नसावे. म्हणजेच उमेदवाराचा जन्म दि. 02 जानेवारी 2014 पूर्वीचा व दि. 01 जुलै 2015 नंतरचा नसावा.
परीक्षेसाठी आवेदनपत्र (फॉर्म) ऑनलाईन किंवा डिमांड ड्राफ्ट (DD) द्वारे मागविता येईल. ऑनलाईन अर्जासाठी RIMC संकेतस्थळावरून फॉर्म व मागील प्रश्नपत्रिकांचा संच मागविता येणार आहे. यासाठी ऑनलाईन शुल्क सर्वसाधारण व इतर प्रवर्गासाठी 600 रुपये तर अनुसूचित जाती/जमातीसाठी 555 रुपये इतके आहे. शुल्काची रक्कम डिमांड ड्राफ्टद्वारे “THE COMMANDANT RIMC FUND” या नावाने एचडीएफसी बँक, बालूपूर चौक, डेहराडून (बँक कोड 1399), उत्तराखंड येथे देय असावी.
अनुसूचित जाती/जमाती उमेदवारांनी जातीच्या दाखल्याची सत्यप्रत जोडणे बंधनकारक आहे. डीडीसोबत अर्ज मागविण्याचा अचूक पत्ता पिनकोडसह इंग्रजी कॅपिटल अक्षरात नमूद करणे आवश्यक आहे. मा. कमांडंट, राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून यांच्यामार्फत पुरविलेले अधिकृत व होलोग्रामयुक्त आवेदनपत्रच वैध राहील. स्थानिक छपाई केलेली किंवा छायांकित प्रती स्वीकारल्या जाणार नाहीत. आवेदन शुल्क परत दिले जाणार नाही.
आवेदनपत्र 2 प्रतींमध्ये भरून त्यासोबत जन्म दाखल्याची प्रमाणित छायाप्रत, अधिवास (Domicile) प्रमाणपत्राची प्रमाणित छायाप्रत, अनुसूचित जाती/जमातीसाठी जातीच्या दाखल्याची छायाप्रत, विद्यार्थ्याचा फोटो, जन्मतारीख व इयत्ता नमूद असलेले शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र (मूळ), आधार कार्डची छायाप्रत तसेच दोन पासपोर्ट आकाराचे फोटो (मागील बाजूस सहीसह) जोडणे आवश्यक आहे. सर्व कागदपत्रांच्या छायाप्रती मुख्याध्यापक किंवा राजपत्रित अधिकाऱ्यांकडून साक्षांकित असाव्यात.
परिपूर्ण भरलेले आवेदनपत्र व आवश्यक कागदपत्रे दि. 05 एप्रिल 2026 पर्यंत मा. आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (राज्यमंडळ), भांबुर्डा, आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूट सेंटरच्या मागे, शिवाजीनगर, पुणे –411004 या पत्त्यावर स्पीड पोस्टाने किंवा समक्ष जमा करावीत. कुठल्याही परिस्थितीत अर्ज RIMC, डेहराडून येथे पाठवू नयेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
ही प्रवेश परीक्षा रविवार, दिनांक 7 जून 2026 रोजी पुणे येथे होणार असून गणित विषयाचा पेपर सकाळी 9.30 ते 11, सामान्य ज्ञान विषयाचा पेपर दुपारी 12 ते 1 आणि इंग्रजी विषयाचा पेपर दुपारी 2.30 ते 4.30 या वेळेत होणार आहे. लेखी परीक्षेत पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची मौखिक परीक्षा याबाबतची माहिती यथावकाश कळविण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी कळविले आहे.
*******
No comments:
Post a Comment