हिंगोली(जिमाका), दि. ११ : राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत दि. १३ ते १५ फेब्रुवारी दरम्यान परळी वैजनाथ (जि. बीड) येथे आयोजित करण्यात येणाऱ्या ऐतिहासिक अखिल भारतीय पशु-पक्षी महा पशुधन एक्स्पो-२०२६ या प्रदर्शनाच्या लोगोचे अनावरण आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते झाले.
यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सखाराम खुणे यांच्यासह पशुसंवर्धन विभागाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
लोगो अनावरणप्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी पशुपालन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. परळी वैजनाथ येथे होणारे हे महा प्रदर्शन देशातील जातीवंत पशुधन आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम ठरणार आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकरी व पशुपालकांना दुग्ध व्यवसायातील जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पशुपालक, तरुण उद्योजक व शेतकरी बांधवांनी या प्रदर्शनास मोठ्या संख्येने भेट देऊन उत्पन्न वाढवावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सखाराम खुणे यांनी या महा पशुधन एक्स्पोमध्ये राज्यातील तसेच राज्याबाहेरील जातीवंत गायी, म्हशी, शेळ्या-मेंढ्या तसेच विविध पक्ष्यांच्या प्रजातींचे दर्शन घडणार आहे. याशिवाय आधुनिक डेअरी फार्मिंग, चारा नियोजन, दुग्ध प्रक्रिया उद्योगांचे भव्य स्टॉल्स उभारण्यात येणार असून पशुधनाचे आरोग्य, लसीकरण व वैज्ञानिक संगोपन या विषयांवर तज्ज्ञ पशुवैद्यकांची विशेष व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत.
लोगो अनावरणानंतर संपूर्ण जिल्ह्यात प्रदर्शनाच्या व्यापक प्रसिद्धीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय संस्था, पंचायत समिती कार्यालये व सार्वजनिक ठिकाणी बॅनर-पोस्टर्सद्वारे जनजागृती करण्यात येणार असून सोशल मीडियाच्या माध्यमातूनही माहिती पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सर्व पशुपालक, शेतकरी व नागरिकांनी या महा पशुधन एक्स्पो-२०२६ मध्ये सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
******

No comments:
Post a Comment