10 February, 2026

हिंगोली नगरीत तीन दिवसीय विधीनाट्य महोत्सवाचे आयोजन

 


हिंगोली(जिमाका), दि. १० : हिंगोली नगरीत राज्य शासनाच्या वतीने दिनांक १४ ते १६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत विधीनाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. या तीन दिवसीय महोत्सवात राज्यातील विविध भागांतील लोककलावंतांकडून पारंपरिक लोककलांचे सादरीकरण करण्यात येणार असून लोककलेच्या समृद्ध परंपरेचा जागर होणार आहे.

सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने राज्यातील लोककलेचे जतन व संवर्धन व्हावे, या उद्देशाने विविध लोककला महोत्सव व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. महाराष्ट्राला लोककला व संस्कृतीचा समृद्ध वारसा लाभलेला असून, या वारशाचे जतन व संवर्धन करण्याचे कार्य शासन विविध उपक्रमांच्या माध्यमातून सातत्याने करत आहे.

राज्यातील दुर्मिळ होत चाललेल्या लोककलांना उर्जितावस्था प्राप्त व्हावी, त्यांचा वारसा टिकून राहावा तसेच या लोककलांना प्रोत्साहन देऊन सांस्कृतिक अस्मिता वृद्धिंगत व्हावी, या हेतूने हा विधीनाट्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. हा महोत्सव दररोज सायंकाळी ६.३० वाजता कै. खा. शिवाजीराव देशमुख सभागृह, रामलीला मैदानाजवळ, बसस्थानक परिसर, हिंगोली येथे संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमाची संकल्पना सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांची असून कार्यक्रमास सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव किरण कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

तीन दिवसीय महोत्सवात संबळ-हलगी जुगलबंदी, वासुदेव, गोंधळ, पोतराज, आराधी, दिमडी-चोंडक जुगलबंदी, जागरण गोंधळ, भारुड, वाघ्या-मुरळी, डायका कथाकथन, गजनृत्य अशा विविध लोककलांचे राज्यातील नामवंत कलाकारांच्या माध्यमातून सादरीकरण करण्यात येणार आहे.

या विधीनाट्य महोत्सवातील सर्व कार्यक्रमांचा लाभ हिंगोली जिल्ह्यातील तसेच परिसरातील सर्व रसिक प्रेक्षकांनी घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

******

No comments: