परीक्षा केंद्र परिसरात मोबाईलवर बंदी; सर्व केंद्रांवर वर्गखोल्यांसह सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य–जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
हिंगोली (जिमाका), दि. ०९ : फेब्रुवारी–मार्च २०२६ दरम्यान होणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ. १२ वी) कॉपीमुक्त व गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत कडक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. सर्व परीक्षा केंद्रांवर वर्गखोल्यांसह संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे अनिवार्य करण्यात आले असून परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात मोबाईल फोनवर बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिली.
इयत्ता १२ वी परीक्षा दि. १० मार्च २०२६ ते दि. १८ मार्च २०२६ या कालावधीत पार पडणार असून दि. १० मार्च २०२६ रोजी इंग्रजी विषयाचा पहिला पेपर सकाळ सत्रात होणार आहे. जिल्ह्यातील ४० परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार असून एकूण १५ हजार २४९ विद्यार्थी परीक्षेस बसणार आहेत.
परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी व गैरप्रकार रोखण्यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर नोडल अधिकारी व भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. तसेच शिक्षण विभागाने वर्ग-१ अधिकारी यांच्या भरारी पथकांच्या भेटीचे नियोजन करण्यात आले आहे. संवेदनशील परीक्षा केंद्रांवर इतर शाळांतील शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. जिल्हा स्तरावर परीक्षा नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम) स्थापन करून सर्व परीक्षा केंद्रांवरील परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्यात येणार आहे.
कॉपी प्रकरण आढळून आल्यास संबंधित शाळेची मान्यता रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे निर्देश देण्यात आले आहेत.
परीक्षा काळात गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात पोलीस अधिनियम कलम ३७ (१)(३) व कलम १४४ लागू करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांच्या आदेशान्वये परीक्षा काळात परीक्षा केंद्रांना भेटी देण्यासाठी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी यांची पथके नियुक्त करण्यात येणार आहेत. परीक्षा कालावधीत कर्मचारी यांनी कामात हयगय किंवा हलगर्जीपणा केल्यास संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
परीक्षा शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व संबंधितांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, पोलीस अधीक्षक निलभ रोहन, प्राचार्य बी. बी. पुटवाड यांनी केले आहे.
परीक्षा प्रक्रिया संदीपकुमार सोनटक्के, शिक्षणाधिकारी (माध्यमिक/योजना) व श्रीमती आसावरी काळे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद हिंगोली यांच्या नियंत्रणाखाली पार पडणार आहे.
***
No comments:
Post a Comment