* जिल्ह्यात इयत्ता १२ वीची परीक्षा सुरु
हिंगोली(जिमाका), दि. १० : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १२ वी) फेब्रुवारी–मार्च २०२६ ही परीक्षा आज मंगळवारपासून सुरु झाली असून, ती १८ मार्च २०२६ या कालावधीत होत आहे. तसेच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १० वी) दिनांक २० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ यादरम्यान हिंगोली जिल्ह्यात आयोजित करण्यात आली आहे.
ही परीक्षा शांततापूर्ण, सुरळीत व गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांच्या परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ लागू करणे आवश्यक असल्याने जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी या संदर्भात आदेश निर्गमित केले आहेत. शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद हिंगोली यांच्या विनंतीनुसार हा आदेश पारित करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील इयत्ता १० वी व १२ वीच्या सर्व परीक्षा केंद्रांवर परीक्षेच्या कालावधीत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ लागू करण्यात आले असून परीक्षा सत्राच्या काळात खालीलप्रमाणे निर्बंध घालण्यात आले आहेत.
परीक्षा उपकेंद्राच्या इमारत व परिसरामध्ये परीक्षा शांततेत पार पाडण्यासाठी अधिकृत व्यक्ती वगळता अन्य कोणत्याही व्यक्तीस प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. परीक्षा उपकेंद्राच्या १०० मीटर परिसरात मोबाईल फोन, झेरॉक्स मशीन तसेच टेलिफोन बूथ सुरू ठेवण्यास बंदी घालण्यात आली आहे. तथापि, सदर आदेश नियुक्त अधिकारी, कर्मचारी तसेच परीक्षेसाठी येणारे विद्यार्थी यांना परीक्षा केंद्रात प्रवेशासाठी लागू राहणार नाहीत. तसेच शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी आणि पोलीस अधीक्षक, हिंगोली यांनी बंदोबस्तासाठी नेमणूक केलेले पोलीस कर्मचारी यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.
परीक्षार्थींना परीक्षा केंद्रात डिजिटल डायरी, मायक्रोफोन, मोबाईल, पेजर, गणकयंत्र (कॅल्क्युलेटर) इत्यादी साहित्य सोबत नेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
नोटीस बजावून संबंधितांचे म्हणणे ऐकून घेण्यास पुरेसा अवधी नसल्याने, आणीबाणीच्या परिस्थितीत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये एकतर्फी आदेश निर्गमित करण्यात येत असल्याचे जिल्हादंडाधिकारी राहुल गुप्ता यांनी स्पष्ट केले आहे.
******
No comments:
Post a Comment