10 February, 2026

हिंगोली जिल्ह्यात इयत्ता १२ वी इंग्रजीचा पेपर सुरळीत पार पडला

 

• परीक्षेला १४ हजार ५३९ विद्यार्थी उपस्थित तर ५९७ अनुपस्थित 



हिंगोली(जिमाका), दि. १० : हिंगोली जिल्ह्यातील इयत्ता १२ वीच्या एकूण ४० परीक्षा केंद्रांवर आज दि. १० फेब्रुवारी, २०२६ रोजी सकाळ सत्रात इंग्रजी विषयाचा प्रश्नपत्रिकेचा पेपर शांततापूर्ण व सुरळीत वातावरणात पार पडला. या परीक्षेसाठी नोंदणीकृत १५ हजार १३६ विद्यार्थ्यांपैकी १४ हजार ५३९ विद्यार्थी उपस्थित होते, तर ५९७ विद्यार्थी अनुपस्थित राहिले. आजच्या परीक्षेची उपस्थिती ९६.०५ टक्के इतकी नोंदविण्यात आली. या परीक्षेदरम्यान कोणतेही कॉपीचे किंवा गैरप्रकाराचे प्रकरण आढळून आले नाही.

परीक्षा प्रक्रियेवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम) स्थापन करण्यात आला होता. या नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून सर्व परीक्षा केंद्रांवरील परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्यात आले. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड तसेच पोलीस अधीक्षक डॉ. निलभ रोहन यांनी विविध परीक्षा केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली.

याशिवाय उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच वर्ग-१ अधिकारी यांनीही परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या. विभागीय मंडळाने नेमलेल्या चार भरारी पथकांनी आज हिंगोली जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांची तपासणी केली. सर्व ४० परीक्षा केंद्रांवर बैठे पथकांची नियुक्ती करण्यात आली असून प्रत्येक केंद्रावर नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

सर्व परीक्षा केंद्रांवर पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची ने-आण करणाऱ्या सहाय्यक परीरक्षकांसोबत पोलीस कर्मचारी देण्यात आले होते. या सर्व उपाययोजनांमुळे आजचा इयत्ता १२ वी इंग्रजी विषयाचा पेपर जिल्ह्यात शांततापूर्ण, शिस्तबद्ध व सुरळीतरीत्या पार पडल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

******

No comments: