09 February, 2026

जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

 



हिंगोली (जिमाका), दि. 09 : जिल्ह्यातील नोकरी इच्छुक व सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, हिंगोली तसेच भारतरत्न नानाजी देशमुख शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १३ फेब्रुवारी २०२६ रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा रोजगार मेळावा भारतरत्न नानाजी देशमुख शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, हिंगोली येथे संपन्न होणार आहे.

या रोजगार मेळाव्यात स्विस अॅकडमी इंग्लिश स्कूल, हिंगोली; संकल्प जॉब प्लेसमेंट प्रा.लि., हिंगोली; खंडेलवाल ज्वेलर्स इंडिया लि., हिंगोली; ग्लोविंग इलेक्ट्रिकल सोलार प्रा.लि., परभणी; धूत ऑटोमोटिव्ह सिस्टीम प्रा.लि., छत्रपती संभाजीनगर; स्वतंत्र मायक्रो फायनान्स, हिंगोली; स्काय प्लेसमेंट प्रा.लि., छत्रपती संभाजीनगर; भारतीय जीवन विमा निगम, हिंगोली; एस.बी.आय. लाईफ इन्शुरन्स, हिंगोली; पलटन सेक्युरिटी फोर्स, हिंगोली; भारत फायनान्स, हिंगोली; बंसल क्लासेस, हिंगोली; चैतन्या इंडिया फिन क्रेडिट प्रा.लि., हिंगोली आदी महाराष्ट्रातील नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. तसेच हिंगोली जिल्ह्यातील शासनाच्या विविध महामंडळांचे स्टॉलही या रोजगार मेळाव्यात लावण्यात येणार आहेत.

या रोजगार मेळाव्यासाठी १० वी, १२ वी, आयटीआय, डिप्लोमा, पदवी व पदवीधर उमेदवारांसाठी त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार सुमारे ३५० रिक्त पदे उपलब्ध असून ती पदे www.rojgar.mahaswayam.gov.in/ व www.ncs.gov.in/ या संकेतस्थळावर अधिसूचित करण्यात आली आहेत. 

उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदांची खात्री करून खाजगी क्षेत्रातील नोकरीसाठी ऑनलाईन अर्ज करावेत.

निवड प्रक्रियेसाठी उमेदवारांनी दि. १३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता स्वतःच्या मूळ कागदपत्रांसह व स्वखर्चाने भारतरत्न नानाजी देशमुख शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, हिंगोली येथे उपस्थित राहावे. रोजगार मेळाव्याबाबत अधिक माहितीसाठी ०२४५६-२२४५७४ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालयाचे सहायक आयुक्त बा. सु. मरे यांनी केले आहे.

******

No comments: