हिंगोली (जिमाका), दि. 09 : केंद्रीय पेट्रोरसायन अभियांत्रिकी एवं प्रौद्योगिकी संस्थान (सिपेट), रसायन व पेट्रोरसायन विभाग, रसायन व खते मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत कार्यरत असलेली राष्ट्रीय स्वायत्त संस्था असून महाराष्ट्रातील प्लास्टिक उद्योगांना तांत्रिक सहाय्य, कुशल मनुष्यबळ निर्मिती तसेच संशोधन व विकास कार्यासाठी मदत करण्याच्या उद्देशाने छत्रपती संभाजीनगर येथे सिपेट केंद्राची स्थापना सन २००६ मध्ये करण्यात आली आहे. सिपेट संस्था आयएसओ 9001:2015 मानांकन प्राप्त असून येथे एआयसीटीई, मान्यताप्राप्त व एमएसबीटीई समतुल्य प्लास्टिक इंजिनीयरिंगचे विविध अभ्यासक्रम राबविले जातात.
सिपेटमध्ये प्रवेशासाठी दरवर्षी ऑल इंडिया लेव्हल सिपेट अँडमिनीस्ट्रेटर टेस्ट आयोजित करण्यात येते व गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठीची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून, सिपेट प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन नोंदणी https://cipet26.onlineregistrationform.org/CIPET/ या संकेतस्थळावर सुरु आहे. ही प्रवेश परीक्षा दि. ७ जून २०२६ रोजी घेण्यात येणार असून प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. २८ मे २०२६ आहे.
यावर्षी दहावी, बारावी, डिप्लोमा व बी.एस्सी. (अंतिम वर्ष)ची परीक्षा देणारे विद्यार्थी निकालाची प्रतीक्षा न करता प्रवेश अर्ज भरू शकतात. सर्व पात्र विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिपेटचे प्रशिक्षण प्रमुख आर. जीवन राम यांनी केले आहे.
सिपेट, छत्रपती संभाजीनगर येथे जागतिक दर्जाचे कॅड/कॅम, टूल रूम, प्लास्टिक प्रोसेसिंग व प्लास्टिक टेस्टिंग विभाग असून अत्याधुनिक यंत्रसामग्रीद्वारे प्लास्टिक उद्योगांना तांत्रिक सहाय्य तसेच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात येते. सिपेटचे सर्व अभ्यासक्रम रोजगार व स्वयंरोजगाराभिमुख असून प्रात्यक्षिकाधारित शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत.
सिपेट छत्रपती संभाजीनगर येथे दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी डिप्लोमा इन प्लास्टिक टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन प्लास्टिक मोल्ड टेक्नॉलॉजी, ३ वर्षे बी.एस्सी. विद्यार्थ्यांसाठी पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन प्लास्टिक प्रोसेसिंग अँड टेस्टिंग, २ वर्षे इंजिनीयरिंग डिप्लोमा धारकांसाठी पोस्ट डिप्लोमा इन प्लास्टिक मोल्ड डिझाईन, १८ महिने हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
अधिक माहितीसाठी ९३७३६८७९१५ किंवा ०२४०–२४७८३२२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.
*****
No comments:
Post a Comment