हिंगोली(जिमाका), दि.
05 : स्टोन क्रशर खदानीमधून अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूक प्रकरणात जप्त करण्यात आलेल्या
जंगम मालमत्तेचा (वाहने व क्रशर मशीन) जाहीर द्वितीय फेरीचा लिलाव आयोजित करण्यात येत
असल्याची माहिती तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी दिली आहे.
अवैध गौणखनिज उत्खनन व
वाहतूक प्रकरणात जप्त करण्यात आलेली वाहने व इतर जंगम मालमत्ता सोडविण्यासाठी संबंधित
कसूरदारांना वारंवार सूचना देऊनही दंडात्मक रक्कम शासनाकडे जमा करण्यात आलेली नाही.
तसेच जप्त जंगम मालमत्ता सोडविण्यासाठी मालक/कसूरदार न्यायालयासमोर हजर झालेले नाहीत.
त्यामुळे एकूण सहा खदानधारकांकडील जप्त वाहने व क्रशर मशीनचा लिलाव करण्यात येणार आहे.
सदर जंगम मालमत्तेचे लघुत्तम
मूल्य उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, हिंगोली यांच्याकडील दि. 19 डिसेंबर 2025 च्या पत्रानुसार
निश्चित करण्यात आले असून, त्या अनुषंगाने अटी व शर्तींच्या अधीन राहून जाहीर लिलावाची
नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे.
जप्त जंगम मालमत्तेचा जाहीर
लिलाव मंगळवार, दि. 10 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत महसूल
मंडळ बासंबा, भांडेगाव, डिग्रस कऱ्हाळे अंतर्गत असलेल्या स्टोन क्रशर खदानच्या ठिकाणी
बोली पद्धतीने घेण्यात येणार आहे.
लिलावामध्ये सहभागी होण्यासाठी
इच्छुकांनी दि. 09 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत तहसील कार्यालयातील
गौणखनिज विभागात अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्जासोबत प्रती वाहन 10 हजार रुपये अनामत
रक्कमेचा धनादेश, पॅनकार्ड, आधारकार्ड व बँक पासबुक/स्टेटमेंटची छायाप्रत सादर करणे
बंधनकारक आहे. पात्र अर्जदारांना लिलावासाठी टोकन देण्यात येईल.
लिलावाबाबत सर्व अधिकार
उपविभागीय अधिकारी, हिंगोली व तहसीलदार, हिंगोली यांनी राखून ठेवले असून, लिलावातील
अटी व शर्तींनुसारच प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
वरील अटी व शर्ती मान्य
असलेल्या इच्छुक नागरिकांनी लिलावामध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन तहसीलदार श्रीकांत
भुजबळ यांनी केले आहे.
*******
No comments:
Post a Comment