‘भारत विस्तार’ डिजिटल प्रणालीचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण
हिंगोली (जिमाका), दि. 17 : भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली आणि कृषी विज्ञान केंद्र, तोंडापूर येथे ‘भारत विस्तार’ या महत्त्वाकांक्षी डिजिटल ॲपच्या कार्यक्रमाचे ऑनलाईन उद्घाटन झाले.
जयपूर (राजस्थान) येथून आयोजित राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमात केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते ‘भारत विस्तार’ ॲपचे लोकार्पण करण्यात आले.
या ॲपच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान, विविध शासकीय योजना, हवामान अंदाज, पीक संरक्षण, मृदा व्यवस्थापन तसेच बाजारभाव यांसारखी अद्ययावत माहिती एकाच क्लिकवर उपलब्ध होणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा केव्हीकेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. पी. पी. शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली वेबकास्टिंगचे नियोजन करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. शेळके यांनी भारत विस्तार ॲपमुळे दुर्गम भागातील शेतकऱ्यांना थेट शास्त्रज्ञांकडून तांत्रिक मार्गदर्शन सुलभ होणार असून, ही कृषी क्षेत्रातील डिजिटल क्रांती ठरेल. हिंगोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
यावेळी उपस्थित शेतकरी, कृषी पदवीधर तसेच महिला बचत गटांच्या सदस्यांनी थेट प्रक्षेपणाद्वारे ॲपच्या कार्यप्रणालीची सविस्तर माहिती घेतली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विषय विशेषज्ञ राजेश भालेराव (कृषी विद्या), अनिल ओळंबे (उद्यानविद्या), अजयकुमार सुगावे (पीक संरक्षण), रोहिणी शिंदे (गृह विज्ञान), डॉ. अतुल मुराई (कृषी विस्तार), साईनाथ खरात (मृदा विज्ञान), डॉ. कैलास गीते (पशु विज्ञान) तसेच विजय ठाकरे यांनी परिश्रम घेतले. तसेच मनीषा मुंगल, ओमप्रकाश गुडेवार, गुलाबराव सूर्यवंशी, मारोती कदम, संतोष हानवते व प्रेमदास जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
******



No comments:
Post a Comment