20 February, 2026

अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 26 फेब्रुवारीला तांत्रिक उद्योजकता परिचय मेळावा व मुलाखतीचे आयोजन



हिंगोली (जिमाका), दि.20 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने हिंगोली जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक, युवती व महिलांसाठी संगणक आधारित डीटीपी एक महिन्याच्या कालावधीचा मोफत अनिवासी तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम दि. 27 फेब्रुवारी  ते 27 मार्च 2026 या कालावधीत हिंगोली येथे आयोजित करण्यात आला आहे.

या 30 दिवशीय प्रशिक्षणासाठी उमेदवारांची निवड करण्याकरिता एक दिवशीय उद्योजकता विकास परिचय मेळावा व मुलाखतीचे आयोजन दि. 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता रेनबो कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, आदर्श कॉलेजजवळ, पाण्याच्या टाकीजवळ, हिलटॉप कॉलनी, हिंगोली येथे करण्यात आले आहे.

प्रशिक्षणामध्ये कॉम्प्युटर फंडामेंटल्स अँड ऑपरेटिंग सिस्टीम, अडोबी फोटोशॉपची ओळख, ग्राफिक डिझाईन मूलतत्त्वे, बॅनर व फ्लेक्स डिझाईन, लोगो डिझाईन, ब्रँडिंग संकल्पना, व्हिजिटिंग कार्ड, पॅम्प्लेट/फ्लायर डिझाईन आदी विषयांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, उद्योग उभारणी प्रक्रिया, उद्योग निवड, बाजारपेठ सर्वेक्षण, प्रकल्प अहवाल तयार करणे, निधी उभारणी, आवश्यक परवाने इत्यादी बाबींवर सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

या प्रशिक्षणासाठी पात्रता किमान इयत्ता 10 वी उत्तीर्ण असून उमेदवार हिंगोली जिल्ह्याचा रहिवासी असावा. वयोमर्यादा 18 ते 45 वर्षे असून उमेदवार अनुसूचित जाती प्रवर्गातील असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणासाठी निवड प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी जातीचा दाखला, रहिवासी  प्रमाणपत्र, आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रिका, पॅन कार्डच्या दोन प्रती व दोन पासपोर्ट आकाराचे छायाचित्रांसह महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, जिल्हा उद्योग केंद्र, प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी  कार्यालय, हिंगोली येथे कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे विभागीय अधिकारी  सुदाम थोटे, बार्टीचे प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ गोवंदे  व प्रकल्प अधिकारी सुधीर आठवले (मो. 9168667133) यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी  कार्यक्रम आयोजक  किसन धाबे (मो. 9370631461) यांच्याशी संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.

*******

No comments: