हिंगोली येथे 28 फेब्रुवारी व 1 मार्चला ग्रंथोत्सव
ग्रंथ प्रदर्शन-विक्री, नवोदितांचे कवी संमेलन, परिसंवाद, व्याख्यानाची मेजवानी
हिंगोली (जिमाका), दि. 25 : महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी, कार्यालय हिंगोली यांच्या विद्यमाने ‘हिंगोली ग्रंथोत्सव-2025’ चे आयोजन करण्यात आले आहे. कै.रं.रा.बियाणी नुतन साहित्य मंदिर वाचनालय, बियाणी नगर, हिंगोली येथे शनिवार, दि. 28 फेब्रुवारी व रविवार, दि. 01 मार्च, 2026 असे दोन दिवसात ग्रंथप्रेमींना विविध कार्यक्रमाची मेजवानी मिळणार आहे. ग्रंथप्रसार, प्रदर्शन व विक्री असा या ग्रंथोत्सवाचा उद्देश असून त्यात शासकीय प्रकाशने व दुर्मिळ ग्रंथ विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत.
दि. 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता कै.र.रा.बियाणी नुतन साहित्य मंदिर वाचनालय, बियाणी नगर येथून मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचा शुभारंभ होणार आहे. या दिंडीमध्ये विविध लोककला सादरीकरण लेझिम पथक, भजनी मंडळ यासह विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे.
साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक श्रीकांत देशमुख यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता ग्रंथोत्सवाचे उद्घाटन होणार आहे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी राहुल गुप्ता हे राहणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे पालकमंत्री नरहरी झिरवाळ, खासदार नागेश पाटील-आष्टीकर, मा. बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष तथा आमदार हेमंत पाटील, आमदार सर्वश्री सतिश चव्हाण, विक्रम काळे, तान्हाजी मुटकुळे, संतोष बांगर, चंद्रकांत नवघरे, नगराध्यक्षा श्रीमती रेखाताई बांगर, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, पोलीस अधीक्षक डॉ. नीलभ रोहन, ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, औरंगाबाद येथील सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे, संतोष जाधव, गजेंद्र बियाणी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
दिनांक 28 फेब्रुवारी, 2026 रोजी दुपारच्या सत्रात दुपारी 3 ते 6 या वेळेत "कवी संमेलनाचे’ आयोजन करण्यात आले आहे. तर दि 01 मार्च रोजी दुसऱ्या दिवशी सकाळी 11 ते दुपारी 2 या कालावधीत कृत्रिम बुद्धीमत्ता आणि वाचन संस्कृती या विषयावर प्रा. डॉ. तुकाराम हापगुंडे तर सृजनशील लेखन या विषयावर प्रा. डॉ. दत्ता सावंत यांचे व्याख्यान होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या सत्रात दुपारी 3 ते 4 या वेळेत बदलती सामाजिक परिस्थिती आणि सार्वजनिक ग्रंथालयाची भूमिका या विषयावर व्याख्यान होणार आहे. तर दुपारी 4 वाजता दोन दिवशीय ग्रंथोत्सवाचा समारोप व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात येणार आहे. या दोन दिवसीय ग्रंथोत्सवास उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रंथोत्सव समन्वय समितीने केले आहे.
******
No comments:
Post a Comment