हिंगोली (जिमाका), दि. 13 : वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथे दुग्ध उत्पादन वाढीसाठी विविध राष्ट्रीयीकृत बँकांच्या माध्यमातून कर्ज वाटप मेळावा उत्साहात पार पडला. मिळालेल्या कर्जातून गावात दूध क्रांती घडेल, असा विश्वास जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी व्यक्त केला.
पांगरा शिंदे येथील रोकडेश्वर मंगल कार्यालयात आयोजित या मेळाव्यात स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया तसेच महाराष्ट्र ग्रामीण बँक यांच्या वतीने दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना कर्ज वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमास जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, दिनेश कुमार झा, दीपक बारहाते, किरण चांदेरकर, वसमत गट विकास अधिकारी प्रफुल्ल तोटेवाड, अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक सुनील झोडगे, जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रवीण राठोड, नाबार्डचे अविनाश लहाने, सरपंच पूनम शिंदे, दत्तगुरु फार्मर प्रोड्युसर कंपनीचे सूर्याजी शिंदे तसेच शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त गंगाधर शृंगारे आदी मान्यवर उपस्थित होते.
या मेळाव्यात हिंगोली जिल्ह्यातील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना 75 दुधाळ म्हशींसाठी सुमारे 1 कोटी 50 लाख रुपयांचे धनादेश वितरित करण्यात आले. तसेच विविध उद्योगांसाठी सुमारे 4 कोटी रुपयांचे कर्ज वाटपही करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता म्हणाले की, शेती व्यवसायास पूरक जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाला मोठी संधी आहे. बँकांच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या कर्जामुळे पांगरा शिंदे गावात दुग्ध उत्पादनात लक्षणीय वाढ होऊन आर्थिक उन्नती साधता येईल. शेतकरी बांधवांनी दुग्ध व्यवसायाकडे अधिकाधिक वळावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी बँक ऑफ इंडिया वसमत शाखेचे शालिकराम जाधव, चोंडी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखा व्यवस्थापक श्री. दैठणकर, भारतीय स्टेट बँक व युनियन बँकेचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
रमेश चेंडके यांच्या दर्पण दूध उत्पादक प्रोड्युसर कंपनीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास पांगरा शिंदे व परिसरातील दुग्ध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन रमेश चेंडके यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वर वानखेडे, साईनाथ शिंदे, सोपान मारकळ, सोनबा शिंदे आदींनी परिश्रम घेतले.
******


No comments:
Post a Comment