विज्ञानवारीसाठी निघालेल्या विद्यार्थ्यांच्या बसला हिरवी झेंडी दाखवून रवाना
* आयुका पुणे येथे शैक्षणिक सहलीचे आयोजन
हिंगोली (जिमाका), दि. 26 : राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त हिंगोली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमधील 46 विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संशोधन संस्था आयुका, पुणे येथे शैक्षणिक अभ्यास सहलीसाठी जाणाऱ्या ‘विज्ञानवारी’ बसला जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले.
यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी नामदेव केंद्रे, गटशिक्षणाधिकारी दत्ता नांदे, केंद्रप्रमुख, शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी आवड निर्माण होऊन भविष्यात संशोधन क्षेत्राकडे वळण्यासाठी या विज्ञानवारीचा उपयोग होईल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
ही सहल 27 व 28 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली असून, हिंगोली जिल्ह्यात उभारण्यात येत असलेल्या जागतिक दर्जाच्या इंडिया प्रयोगशाळेची मातृसंस्था असलेल्या आयुका येथे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वैज्ञानिक कार्यपद्धतीची ओळख होणार आहे. हा उपक्रम हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष तथा आमदार हेमंत पाटील यांच्या पुढाकारातून राबविण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा, संशोधन वृत्ती वाढीस लागावी आणि शास्त्रज्ञांच्या कार्याची जवळून ओळख व्हावी, या उद्देशाने या शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे विज्ञानाधिष्ठित समाज निर्मितीस निश्चितच चालना मिळणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
**
.jpeg)

.jpeg)

No comments:
Post a Comment