पीएम सूर्यघर मुफ्त बिजली योजनेची प्रभावी अंमलबजावणीसाठी करा - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
हिंगोली, दि.२६ (जिमाका): पी एम सूर्यघर मोफत वीज या महत्त्वाकांक्षी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज झालेल्या आढावा बैठकीत दिले.
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली महाऊर्जा व महावितरण विभागाची संयुक्त आढावा बैठक घेण्यात आली.
महाऊर्जा विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या पी एम सूर्यघर मोफत वीज योजना या महत्त्वाकांक्षी योजनेचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
यावेळी हिंगोली जिल्ह्यातील विविध शासकीय इमारतींवर पारेषण सलग्न सौर ऊर्जा संच बसविण्याच्या कामाची सद्यस्थिती तपासण्यात आली. तसेच प्रकल्पाच्या अंमलबजावणीदरम्यान येत असलेल्या तांत्रिक अडचणी, पारेषण यंत्रणेशी समन्वय, वीज जोडणी प्रक्रिया आदी मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
महाऊर्जाचे जिल्हा व्यवस्थापक प्रशांत गायकवाड व महावितरणचे अधीक्षक अभियंता सुरेंद्र मुंगारे यांना सदर प्रकल्पाची कामे गतीने पूर्ण करून योजना लवकरात लवकर कार्यान्वित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच दोन्ही विभागांनी परस्पर समन्वय साधून येणाऱ्या तांत्रिक अडचणी तात्काळ दूर कराव्यात व योजनेची उद्दिष्टे यशस्वीपणे साध्य करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.
या बैठकीमुळे जिल्ह्यात सौर ऊर्जेचा वापर वाढीस लागून ऊर्जा बचत व पर्यावरण संरक्षणाला चालना मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
*****

No comments:
Post a Comment