‘मिनी सरस प्रदर्शन 2026’ चे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते उद्घाटन
• सर्वांसाठी प्रदर्शन प्रवेश विनामूल्य – प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे
• ग्रामविकास व पंचायतराज विभाग
उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, हिंगोली
हिंगोली, दि. १३ (जिमाका) : उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद, हिंगोली यांच्या वतीने आयोजित ‘मिनी सरस व जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन व विक्री – 2026’ चे उद्घाटन आज जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्हा परिषद कन्या प्रशाला मैदान, हिंगोली येथे सुरू असलेले हे प्रदर्शन येत्या गुरुवार (दि. १९) पर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, जिल्हा कृषी अधीक्षक राजेंद्र कदम, आरसेटीचे संचालक बनसोडे तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे उपस्थित होते.
ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समूहांतील महिलांच्या कर्तृत्वाला व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या कौशल्याला प्रोत्साहन देणे तसेच त्यांच्या उत्पादित मालाला व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे.
या मिनी सरस व जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्रीमध्ये स्वयंसहाय्यता समूहांनी तयार केलेले विविध खाद्यपदार्थ, मसाले, ग्रामीण कलाकुसर वस्तू तसेच इतर आकर्षक उत्पादने प्रदर्शन व विक्रीसाठी उपलब्ध असून नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी शनिवार व रविवार या दोन दिवसांत सहकुटुंब प्रदर्शनास भेट देऊन ग्रामीण भागातील बचतगटातील महिलांनी उत्पादित केलेले खाद्यपदार्थ व इतर उत्पादने खरेदी करून महिलांच्या उपजीविकेस हातभार लावावा, असे आवाहन प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे यांनी केले आहे.
सदर प्रदर्शनासाठी प्रवेश विनामूल्य असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
*****


No comments:
Post a Comment