हिंगोली(जिमाका), दि. १० : आजपासून हिंगोली जिल्ह्यात इयत्ता १२ वीची वार्षिक परीक्षा सुरू झाली असून सकाळच्या सत्रात इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेने परीक्षेला प्रारंभ झाला. परीक्षेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून आवश्यक ती दक्षता घेण्यात आली असून परीक्षा केंद्रांवरील व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली.
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी लिंबाळा मक्ता येथील राधाबाई मुसळे ज्युनिअर कॉलेज या परीक्षा केंद्रास भेट देऊन पाहणी केली. यावेळी सेनगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी योगेशकुमार मीना तसेच शिक्षणाधिकारी श्रीमती आसावरी काळे उपस्थित होत्या.
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी परीक्षा व्यवस्थापन, शिस्त व विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा यांचा आढावा घेतला.
दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनीही विविध परीक्षा केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. त्यांनी अमृतराव पाटील कनिष्ठ महाविद्यालय, माळहिवरा तसेच जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, माळहिवरा आणि छत्रपती शाहू महाराज कनिष्ठ महाविद्यालय, आडगाव येथील परीक्षा केंद्रांची तपासणी केली.
परीक्षा शांततापूर्ण, शिस्तबद्ध व गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन, शिक्षण विभाग व संबंधित यंत्रणांकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
*****




No comments:
Post a Comment