28 February, 2026

ग्रंथ वाचनातूनच समाजाची खरी प्रगती – ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत देशमुख

 


हिंगोली (जिमाका), दि. 28 : समाजातील वाढत्या समस्या, असमानता आणि विचारांतील गोंधळ यावर प्रभावी उपाय म्हणजे ग्रंथ वाचन व विचारांची चिकित्सा होय. प्रत्येकाने दरवर्षी किमान काही रकमेची पुस्तके खरेदी करून वाचनाची सवय लावली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत देशमुख यांनी केले.

येथील कै. रं.रा. बियाणी नूतन साहित्य मंदिर वाचनालयात आयोजित हिंगोली ग्रंथोत्सव-2025 चे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता होते. याप्रसंगी व्यासपीठावर प्रा. विलास वैद्य, प्रा. खंडेराव सरनाईक, अशोक अर्धापूरकर, सहायक ग्रंथालय संचालक सुनील हुसे, विभागीय ग्रंथालयाचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव, जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक, सहायक माहिती अधिकारी चंद्रकांत कारभारी आदी उपस्थित होते.

यावेळी श्रीकांत देशमुख यांनी सांगितले की, लोकसंख्या वाढत असताना माणुसकी कमी होत चालली आहे, ही चिंतेची बाब आहे. इतिहासातील महात्मा ज्योतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत तुकाराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांसारख्या महान व्यक्तींच्या विचारांचा अंगीकार केल्यास समाज अधिक सक्षम होऊ शकतो. वाचनामुळे विवेक, प्रश्न विचारण्याची क्षमता आणि सामाजिक जाण विकसित होते, असे त्यांनी नमूद केले. प्रत्येक घरात लहानसे ग्रंथालय असावे, असे आवाहनही त्यांनी केले.


वाचनातून व्यक्तिमत्त्व विकास – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता


अध्यक्षीय भाषणात राहुल गुप्ता यांनी विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकांसोबत विविध साहित्याचे वाचन करावे, असे आवाहन केले. दर महिन्याला किमान एक पुस्तक वाचण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी करावा, असे ते म्हणाले. वाचनामुळे विचारांमध्ये व्यापकता येते आणि योग्य निर्णयक्षमता विकसित होते. स्पर्धा परीक्षांसाठीही वाचन अत्यंत उपयुक्त ठरते, असे त्यांनी स्पष्ट केले.


ग्रंथोत्सव ही वैचारिक चळवळ – प्रा. विलास वैद्य


ग्रंथोत्सव हा केवळ साहित्यिक कार्यक्रम नसून हिंगोलीची वैचारिक परंपरा जपणारी चळवळ असल्याचे प्रा. विलास वैद्य यांनी सांगितले. साहित्य वाचनामुळे संवेदनशीलता व विचारांची परिपक्वता वाढते, त्यामुळे प्रत्येकाने वाचनाकडे वळावे, असे त्यांनी नमूद केले.


प्रास्ताविकात जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी ग्रंथोत्सवाच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला. यामध्ये  परिसंवाद, व्याख्याने, कवी संमेलन आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी या ज्ञानोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यंदा साहित्यिकांचा सत्कार, QR कोडद्वारे सभासद नोंदणी आणि अभिप्राय संकलन उपक्रम राबविण्यात आला आहे.


ग्रंथालय सहायक संचालक सुनिल हुसे यांनी हिंगोली जिल्हा हा समृद्ध जिल्हा असून अभिप्राय संकलन पेटी व क्यूआर कोडचा वापर करणारा हिंगोली जिल्हा पहिला ठरला आहे. संत गाडगेबाबा व बहिणाबाईची शिकवण ग्रंथातून मिळणार आहे. त्यामुळे सर्वांनी ग्रंथ वाचले पाहिजेत. ग्रंथातून आनंद मिळतो. त्यामुळे सर्वांनी ग्रंथोत्सवाचा लाभ घ्यावा व येथे उभारण्यात आलेल्या पुस्तकांच्या स्टॉलला भेटी देऊन पुस्तके खरेदी करावीत. प्रत्येकांनी किमान एक तरी पुस्तक खरेदी करुन घर समृद्ध करावे, असे आवाहन केले. यावेळी प्रा. खंडेराव सरनाईक यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. नामदेव दळवी व गजानन शिंदे यांनी केले, तर सर्व उपस्थितांचे प्रा. विलास खरात यांनी मानले. यावेळी संगीता चौधरी लिखित 'रंग जीवनाचे' या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. गंगादेवी देवडा अंध विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. या कार्यक्रमात साहित्यिक व ग्रंथदिंडीमध्ये सहभाग घेतलेल्या शाळांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. 

या कार्यक्रमास जिल्ह्यातील सार्वजनिक वाचनालयाचे प्रतिनिधी, ग्रंथपाल, पत्रकार, शिक्षक, विद्यार्थी, महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


 

ग्रंथोत्सवानिमित्त आयोजित ग्रंथदिंडीला उस्फूर्त प्रतिसाद


ग्रंथोत्सवानिमित्त आज सकाळी येथील कै. रं.रा.बियाणी नूतन साहित्य मंदिर वाचनालयापासून  ते जुनी नगर परिषद येथून ग्रंथोत्सव कार्यक्रमाच्या ठिकाणापर्यंत ग्रंथदिडी काढण्यात आली. या ग्रंथदिंडीचे उद्घाटन नगरसेवक श्रीराम बांगर यांच्या हस्ते ग्रंथाचे पूजन करुन करण्यात आले. या ग्रंथदिंडीला शालेय विद्यार्थी, नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. या ग्रंथदिंडीमध्ये सरजूदेवी भिकूलाल भारुका आर्य कन्या विद्यालय, माणिक स्मारक आर्य विद्यालय, विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल, सत्यनारायण विद्यामंदिर, गुरुदास काम माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या ग्रंथदिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी अत्यंत सुदर असे वेशभूषा, लेझीम नृत्य सादर केले.  

या ग्रंथोत्सवामध्ये  शासकीय  ग्रंथागार  छत्रपती संभाजीनगर,  संविधान जागर अभियान ग्रंथ विक्री, प्रणवी बुक सेंटर, सम्राट बुक स्टॉल, प्रगती बुक स्टॉल, श्री गणेश बुक डेपो यासह विविध पुस्तकाचे स्टॉल लावण्यात आले आहेत. यावेळी शासकीय ग्रंथ भांडाराचेही मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तसेच मान्यवरांनी येथे लावलेल्या ग्रंथ स्टॉल भेटी देवून ग्रंथांची पाहणी केली.

******** 











No comments: