02 February, 2026

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून सेनगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची पाहणी

 







हिंगोली(जिमाका), दि. 02 : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिनांक 31 जानेवारी रोजी सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील पीएम श्री जिल्हा परिषद प्रशाला, आजेगाव येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा तसेच जयपूर येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन पाहणी केली.


यावेळी त्यांनी शाळेतील वर्गखोल्या, अध्यापन पद्धती तसेच विद्यार्थ्यांचा अभ्यास घेऊन शैक्षणिक गुणवत्तेची तपासणी केली. यासोबतच शाळांमधील इतर आवश्यक सुविधांचीही पाहणी करण्यात आली.


पाहणीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशालेच्या इमारतीची प्रत्यक्ष पाहणी करून मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, विद्यार्थी व पालक यांच्याशी संवाद साधला. शाळेच्या सध्याच्या परिस्थितीबाबत तसेच शैक्षणिक प्रगतीसंदर्भात यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.


गोरेगाव, आजेगाव व जयपूर येथील दक्ष पालकवर्ग व शाळा व्यवस्थापन समितीच्या कार्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी केवळ शासनाचे प्रयत्न पुरेसे नसून, पालक व ग्रामस्थांचा सक्रिय सहभागही तितकाच महत्त्वाचा असल्याचे आवाहन त्यांनी केले.


या वेळी संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, नागरिक तसेच पालक उपस्थित होते.

******

No comments: