25 February, 2026

 महाज्योतीकडील स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम सुरूच 


* विद्यार्थ्यांच्या मागणीमुळे ऑनलाईन प्रशिक्षणासही चालना



हिंगोली (जिमाका), दि. 25 :- महाज्योतीमार्फत 11 प्रकारचे स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून संघ लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, राज्यसेवा व संयुक्त गट ब व क तसेच मिलीटरी भरती या परीक्षांचे प्रशिक्षण सध्या ऑफलाईन पद्धतीने सुरू आहे. या प्रशिक्षणाच्या स्वरूपात कोणताही बदल करण्यात आलेला नसून विद्यार्थ्यांना देण्यात येणारे विद्यावेतन व आकस्मिक निधी नियमितपणे चालू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

संघ लोकसेवा आयोग (युपीएससी) प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांना प्रतिमाह 13 हजार रुपये विद्यावेतन तसेच एकवेळ 18 हजार रुपये आकस्मिक निधी दिला जातो. तर एमपीएससी राज्यसेवा, गट ब व क आणि मिलीटरी भरती प्रशिक्षणासाठी प्रतिमाह 10 हजार रुपये विद्यावेतन व एकवेळ 12 हजार रुपये आकस्मिक निधी प्रदान करण्यात येतो.

सन 2025-26 या आर्थिक वर्षात विविध प्रशिक्षणांद्वारे मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. त्यामध्ये महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा प्रशिक्षणातून 298, कर्मचारी निवड आयोग प्रशिक्षणात 499, मिलीटरी भरती प्रशिक्षणात 1500, एमबीए (सीएटी/सीएमएटी-सीईटी) प्रशिक्षणात 1500, युजीसी नेट/सीएसआयआर/एमएच-सेट मध्ये 1200, युपीएससी मध्ये 400, एमपीएससी गट ब व क मध्ये 400, एमपीएससी राज्यसेवा प्रशिक्षणात 300 तसेच जेइइ/नीट/एमएचटी-सीईटी प्रशिक्षणात 3500 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

दरम्यान, आयबीपीएस-पीओ, बँकिंग, रेल्वे, कर्मचारी निवड आयोग व रेल्वे भरती या परीक्षांचे स्वरूप ऑनलाईन असल्याने सन 2026-27 पासून संबंधित प्रशिक्षण कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने राबविण्याचा प्रस्ताव आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांना निवास-भोजनाऐवजी टॅबलेट व डेटा सिम देण्यात येणार असून घरबसल्या प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध होणार आहे. 

ऑनलाईन प्रशिक्षणाबाबत विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी प्राप्त झाली आहे. महाज्योतीकडे एकूण 44 हजार 903 अर्ज प्राप्त झाले असून त्यामध्ये एमपीएससी अभियांत्रिकीसाठी 4 हजार 839, एसएससी साठी 14 हजार 447, बँकिंग/रेल्वे/एलआयसीसाठी  18 हजार 265 व आरआरबी साठी 7 हजार 352 अर्जांचा समावेश आहे. तसेच जेइइ/नीट/एमएचटी-सीईटी प्रशिक्षणासाठी 41 हजार 803 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते.

विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या टॅबलेटचा बॅटरी बॅकअप सुमारे 12 तासांचा असल्याने वीज खंडित झाल्यासही शिक्षणात अडथळा येणार नाही. तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या परिसरात उपलब्ध असलेल्या कोणत्याही  नेटवर्क कंपनीचे सिम निवडण्याची मुभा देण्यात आली आहे.

ऑनलाईन प्रशिक्षणामध्ये लाईव्ह मार्गदर्शन, शंका निरसन, साप्ताहिक परीक्षा तसेच आवश्यक नोट्स व पुस्तके पीडीएफ  स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आर्थिक अडचणींमुळे किंवा कौटुंबिक कारणांमुळे बाहेरगावी जाऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या सुविधेचा लाभ मिळणार आहे.। 

वरील सर्व बाबींचा विचार करता, कोणताही प्रशिक्षण कार्यक्रम बंद नसून चालू आर्थिक वर्षातील सर्व प्रशिक्षण पूर्ण झालेले आहेत. विद्यार्थ्यांच्या वाढत्या मागणीचा विचार करूनच ऑनलाईन प्रशिक्षणाचा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.  

******

No comments: