09 February, 2026

'सुरक्षित इंटरनेट दिना'निमित्त नागरिकांना एआय वापराबाबत दक्षतेचे आवाहन * सुरक्षित इंटरनेट दिन आज 10 फेब्रुवारीला

 


 

हिंगोली (जिमाका), दि. 09 : सुरक्षित इंटरनेट दिन उद्या 10 फेब्रुवारी रोजी असून, त्यानिमित्त नागरिकांना एआय वापराबाबत दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी राम मीना यांनी केले आहे.

सुरक्षित इंटरनेट दिन-2026 निमित्त राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र, सी-डॅक तसेच संबंधित संस्थांच्या वतीने स्मार्ट टेक, सेफ चॉइसेस : एआयचा सुरक्षित व जबाबदार वापर या विषयावर जनजागृती करण्यात येणार आहे. या उपक्रमातून नागरिकांनी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करताना सावधगिरी बाळगावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

डीपफेक व्हिडिओ व क्लोन केलेले आवाज हे वास्तवासारखे दिसू शकतात. त्यामुळे भावनिक प्रतिक्रिया देण्यापूर्वी विश्वसनीय स्त्रोतांकडून माहितीची पुष्टी करणे आवश्यक आहे. वैयक्तिक माहितीचे संरक्षण करण्यासाठी डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण कायद्याची तरतूद असून, गरज असेल तेव्हाच वैयक्तिक माहिती शेअर करावी, असेही सांगण्यात आले.

एआय-आधारित घोटाळ्यांमध्ये तातडीची भावना किंवा भीती निर्माण केली जाते. त्यामुळे कोणतीही कृती करण्यापूर्वी थांबून विचार करणे आणि माहितीची पडताळणी करणे आवश्यक आहे. सोशल मीडियावर वैयक्तिक तपशील टाकण्यापूर्वी पुनर्विचार करावा. तसेच वैद्यकीय, कायदेशीर किंवा आर्थिक सल्ल्यासाठी केवळ एआयवर अवलंबून न राहता तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

अँप परवानग्या नियमितपणे तपासून अनावश्यक प्रवेश काढून टाकावा. व्हिडिओमधील अनैसर्गिक चेहरे, ओठांची हालचाल किंवा आवाजातील विसंगती ही एआय हाताळणीची चिन्हे असू शकतात, याची जाणीव ठेवावी. कोणत्याही फोन संभाषणादरम्यान ओटीपी, आधार, पॅन किंवा बँक तपशील यांसारखी संवेदनशील माहिती उघड करू नये, असे आवाहन करण्यात आले.

भावनिक कथा किंवा तातडीच्या मदतीच्या विनंत्या या एआय-निर्मित घोटाळे असू शकतात. मदत करण्यापूर्वी त्यांची खातरजमा करावी. तसेच जास्त परताव्याचे आश्वासन देणाऱ्या ऑनलाईन गुंतवणूक ऑफरवर विश्वास ठेवू नये, असेही सांगण्यात आले.

सुरक्षित इंटरनेट वापरासंबंधी अधिक माहितीसाठी www.isea.gov.in व www.staysafeonline.in या संकेतस्थळांना भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

******

No comments: